भजन महोत्सव २०२६ चे उद्घाटन; दत्ता सामंत यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मान
मालवण (प्रतिनिधी) : भजन ही केवळ करमणुकीची कला नसून संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे प्रभावी माध्यम आहे. भजनातून चांगले विचार, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्माची कास धरल्यास मनाला शांती आणि जीवनाला योग्य दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन मालवणचे उद्योजक दत्ता सामंत यांनी केले.
मालवण येथील संतसेना मार्गावरील श्री भैरवी देवालयात आयोजित भजन महोत्सव २०२६ च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी दत्ता सामंत यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच बुवा विनय नांदोस्कर यांचा दत्ता सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सामंत म्हणाले की, कोकणच्या मातीत भजन, कीर्तन आणि अध्यात्माची समृद्ध परंपरा आहे. या परंपरेतून पिढ्यान्पिढ्या संस्कारांची शिदोरी पुढे गेली आहे. भजनाच्या माध्यमातून संतांचे विचार आणि अध्यात्मिक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे अशा भजन महोत्सवांचे आयोजन ही काळाची गरज आहे.
अध्यात्म म्हणजे केवळ देवपूजा नव्हे, तर माणसाने माणसाशी प्रेमाने वागणे, समाजासाठी योगदान देणे आणि पुढील पिढीला चांगले संस्कार देणे होय. भजनातून भक्तीबरोबरच एकता, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होते. त्यामुळे भजनाची परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाईल आणि आधुनिक जीवनशैलीच्या काळात तरुण पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम प्रभावी ठरू शकतात. संतपरंपरेतील विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरजही सामंत यांनी अधोरेखित केली.
या कार्यक्रमाला सभापती प्रज्ञा चव्हाण, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, बाळगोपाळ मंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण, भैरवी देवालय मंडळाचे अध्यक्ष विजय चव्हाण, आनंद आचरेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कांता चव्हाण यांनी केले.










