Marine Home Guards Rescue 25-Year-Old Mumbai Tourist from Drowning at Achara Beach
Two marine home guards, Nitesh Gurav and Aniket Parab, rescued a 25-year-old Mumbai tourist from drowning in strong currents at Achara beach in Sindhudurg.
मालवण (प्रतिनिधी) : समुद्राच्या जोरदार प्रवाहात बुडू लागलेल्या मुंबईच्या २५ वर्षीय पर्यटकाला वाचविण्यात आचरा समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या दोन मरीन होमगार्ड्सना यश आले. नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांनी प्रसंगावधान राखत समुद्रात धाव घेत पर्यटकाला सुरक्षित बाहेर काढले. मंगळवारी सकाळी घडलेल्या या थरारक घटनेत दोन्ही जवानांनी दाखविलेल्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. त्यांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.
भरतीच्या प्रवाहात पर्यटक ओढला गेला
मुंबईहून आचरा येथे नातेवाइकांकडे आलेले एक कुटुंब मंगळवारी सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी कुटुंबातील मोहम्मद खान समुद्रस्नानासाठी पाण्यात उतरले. मात्र, भरतीच्या जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते समुद्रात ओढले जाऊन बुडू लागले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. खान यांना वाचविण्यासाठी नातेवाइकांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.
जीवाची पर्वा न करता समुद्रात घेतली धाव
समुद्रकिनाऱ्यावर कर्तव्यावर असलेल्या मरीन होमगार्ड नितेश गुरव आणि अनिकेत परब यांच्या कानावर मदतीसाठी सुरू असलेला आक्रोश पडताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्राच्या दिशेने धाव घेतली. भरतीचा जोर आणि उसळत्या लाटांचा धोका असतानाही दोघांनी बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी मोहम्मद खान यांना सुरक्षितपणे समुद्राबाहेर काढले.
दोन्ही जवानांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे पर्यटकाला वेळेत मदत मिळाली आणि संभाव्य दुर्घटना टळली.
पोलीस आणि ग्रामस्थांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्यासह माजी सरपंच राजन गावकर, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, पोलीस पाटील तन्वी जोशी, जगन्नाथ जोशी, अजय कोयंडे, तुकाराम पडवळ, मीनाक्षी देसाई, हेमंत पेडणेकर, विशाल वैजलं, दिगंबर घाडीगावकर, मनोज पुजारे, सावंत तसेच अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पर्यटकाच्या कुटुंबीयांना धीर दिला.
पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे पोलिसांचे आवाहन
संकटाच्या क्षणी कर्तव्याला प्राधान्य देत नितेश गुरव आणि अनिकेत परब यांनी दाखविलेल्या धाडसामुळे एका पर्यटकाचे प्राण वाचले. पर्यटकाच्या कुटुंबीयांनी दोन्ही जवानांचे आभार मानले. पोलीस आणि ग्रामस्थांनीही त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले.
भरतीच्या वेळी समुद्रातील प्रवाह आणि लाटांची तीव्रता यांचा अंदाज बांधणे कठीण असते. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रात उतरताना आवश्यक खबरदारी घ्यावी आणि समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी केले.












