मालवण (प्रतिनिधी) : पारंपरिक उखाण्यांना आधुनिक कल्पकतेची जोड देत महिलांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे.
ही स्पर्धा सर्व वयोगटांतील महिलांसाठी खुली असून विवाहित, कुमारिका आणि विधवा महिलांनाही सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेतीला पैठणी साडी, द्वितीय क्रमांकाच्या विजेतीला कोल्हापुरी साज, तर तृतीय क्रमांकाच्या विजेतीला हँडबॅग देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धक महिलांनी स्वतःचा उखाणा तोंडपाठ करून सादर करणे आवश्यक आहे. उखाणा मराठी किंवा मालवणी भाषेत सादर करता येईल. उखाण्यात अश्लील अथवा आक्षेपार्ह आशय नसावा. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणारा मजकूर टाळणे बंधनकारक आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनात मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना संमेलनस्थळी सहभाग प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
मालवण आणि परिसरातील महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने करण्यात आले आहे.












