Vanrai Bund Built in Chindar Under Seva Sankalp Campaign
मालवण (प्रतिनिधी) : वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने चिंदर येथे ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत वनराई बंधारा उभारण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा, ग्रामपंचायत चिंदर आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्थानिक ओढ्यावर दगड आणि मातीने भरलेल्या पोत्यांचा नियोजनबद्ध वापर करून वनराई बंधारा उभारण्यात आला. या बंधाऱ्यामुळे ओढ्यातील पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून, परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे.
या श्रमदान उपक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश घुटुकडे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी संजय माने, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव, जिल्हा बँकेचे अधिकारी श्री. मेस्त्री, ग्रामपंचायत कर्मचारी रणजीत दत्तदास, विश्राम माळगावकर, तुषार पवार, राज पालकर, चिंदरचे पोलीस पाटील, तसेच शिक्षक संदीप रावले, डॉ. दत्तात्रय जाधव, महेंद्र पारिपत्ये, सखाराम राजम, निलेश राठोड, प्रकाश शेलार आणि शिक्षकेतर कर्मचारी केदार शिर्के यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासोबतच सामूहिक श्रमदानातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.











