The seventh Vasantrao Abhyankar Science Fair concluded at Topiwala High School in Malvan, featuring 130 science models, 55 mathematical rangolis and 45 lanterns created by students.
सातव्या वर्षातील विज्ञान जत्रेत १३० वैज्ञानिक प्रतिकृती, ५५ गणितीय रांगोळ्या आणि ४५ आकाशकंदिलांचे प्रदर्शन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
मालवण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारी मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल व ना. अ. दे. टोपीवाला ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित स्व. प्रा. वसंतराव अभ्यंकर विज्ञान जत्रा २०२६ उत्साहात संपन्न झाली. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या या विज्ञान जत्रेचे यंदा सातवे वर्ष होते. विज्ञान प्रतिकृती, गणितीय वैज्ञानिक रांगोळी, आकाशकंदील आणि मराठी भाषा संवर्धन उपक्रम अशा विविध विभागांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवले.
प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ. के. एस. कोरगांवकर यांच्या नावाने साकारलेल्या ‘डॉ. के. एस. कोरगांवकर विज्ञान नगरी’मध्ये या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. शाळा समितीचे अध्यक्ष शैलेश खांडाळेकर आणि मालवण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य जी. व्ही. सामंत यांच्या हस्ते फीत उलगडून विज्ञान जत्रेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य दिगंबर सामंत, सचिव विजय कामत, मुख्याध्यापक एल. व्ही. वळंजू, पर्यवेक्षक देविदास वेरलकर आदी उपस्थित होते. शाळा समिती अध्यक्ष शैलेश खांडाळेकर यांच्या हस्ते आकाशकंदिलाचे अनावरणही करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक एल. व्ही. वळंजू यांनी प्रास्ताविकात स्व. प्रा. वसंतराव अभ्यंकर आणि माजी विद्यार्थी महेश अभ्यंकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. महेश अभ्यंकर यांनी सात वर्षांपूर्वी वडिलांच्या स्मरणार्थ विज्ञान जत्रेची सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.
विज्ञान जत्रेचे उद्घाटक शैलेश खांडाळेकर यांनी वाचनामुळे ज्ञानसमृद्धी होते, संवादकौशल्य विकसित होते आणि नवकल्पनांना चालना मिळते, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांमध्ये संघभावना असणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अध्यक्षीय भाषणात जी. व्ही. सामंत यांनी डॉ. महेश अभ्यंकर यांच्या आर्थिक सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील विज्ञानविषयक संस्थांच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण पायाभरणी केल्याचे त्यांनी नमूद केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनाला चालना मिळण्यासाठी समाजानेही योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. माजी मुख्याध्यापक मिलिंद अवसरे यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.
शिक्षकांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
विज्ञान जत्रेच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल प्रशालेचे ज्येष्ठ कलाशिक्षक बी. जी. सामंत यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी ओम आंबेरकर याने मागील वर्षी सादर केलेल्या प्रतिकृतीसाठी तालुकास्तरावर प्रथम, जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवत राज्यस्तरावर सादरीकरण केले होते. त्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. तसेच अस्मी आठलेकर हिने वक्तृत्व स्पर्धेत तालुकास्तरावर द्वितीय, जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत कोल्हापूर विभागात सादरीकरण केल्याबद्दल तिचाही सन्मान करण्यात आला.
१३० वैज्ञानिक प्रतिकृती, ५५ रांगोळ्या आणि ४५ आकाशकंदील
विज्ञान जत्रेतील विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विज्ञान प्रतिकृती निर्मिती स्पर्धेत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एकूण १३० प्रतिकृती साकारल्या. गणितीय वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेत १०५ विद्यार्थ्यांनी ५५ रांगोळ्या साकारल्या, तर आकाशकंदील स्पर्धेत सुमारे ११० विद्यार्थ्यांनी तयार केलेले ४५ आकाशकंदील प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.
विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनातील गटांना वैज्ञानिकांची नावे देण्यात आली होती. पाचवी-सहावीसाठी ‘डॉ. होमी भाभा गट’, सातवी-आठवीसाठी ‘आर्यभट्ट गट’, नववी-दहावीसाठी ‘रामानुजन गट’ आणि अकरावी-बारावीसाठी ‘सी. व्ही. रामन गट’ अशी विभागणी करण्यात आली. प्रशालेत विविध वैज्ञानिकांच्या प्रतिमाही लावण्यात आल्या होत्या. रांगोळी, प्रतिकृती, मराठी भाषा संवर्धन उपक्रम आणि आकाशकंदील या विभागांना मान्यवरांनी भेट दिली. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे परीक्षण केले.
विजेत्यांना सन्मानचिन्हे, प्रमाणपत्रे आणि पदके
दुपारच्या सत्रात पारितोषिक वितरण सोहळा झाला. यावेळी शाळा समिती अध्यक्ष शैलेश खांडाळेकर, जी. व्ही. सामंत, मुख्याध्यापक एल. व्ही. वळंजू, पर्यवेक्षक देविदास वेरलकर आणि ज्येष्ठ कलाशिक्षक बी. जी. सामंत उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक महेश धामापूरकर, निबंध स्पर्धेचे परीक्षक देविदास वेरलकर, आकाशकंदील स्पर्धेच्या परीक्षक मानसी धामापूरकर, वैज्ञानिक प्रतिकृती स्पर्धेच्या परीक्षक मैत्रेयी बांदेकर आणि रांगोळी स्पर्धेचे परीक्षक बी. जी. सामंत यांनी स्पर्धांविषयी मनोगत व्यक्त केले. विविध विभागांतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा, जय गणेश इंग्लिश मीडियम आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रतिनिधींनीही विज्ञान जत्रेला भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दर्शना सामंत यांनी केले.











