मुंबईसह सहा शहरांतील २९ ठिकाणी छापे; मोबाईल, लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त
शेअर बाजारात व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शेअर्सचे भाव कृत्रिमरीत्या वाढवून नफा कमावल्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन कंपन्यांशी संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, सुमारे २०० कोटी रुपयांची ट्रेडिंग खाती गोठवण्यात आली आहेत.
‘आर. एम. ड्रिप अँड स्प्रिंकलर्स’ आणि ‘आर अँड बी डेनिम्स’ या कंपन्यांशी संबंधित व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत निवडक व्यक्तींना कमी किमतीत सुमारे ३.५ कोटी शेअर्स वितरित करण्यात आल्याचा आरोप आहे.
त्यानंतर ‘नंदीग्राम स्टॉक टिप्स’ यांसारख्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संबंधित शेअर्स खरेदी करण्यासाठी कथितरीत्या खोटा प्रचार करण्यात आला. त्यामुळे शेअर्सच्या किमती वाढल्यानंतर ते विकून नफा कमावण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. शेअर बाजारातील अशा प्रकाराला ‘पंप अँड डंप’ असे म्हटले जाते.
या प्रकरणी ईडीच्या मुंबई विभागाने १६ ऑक्टोबर रोजी मुंबई, नाशिक, अहमदाबाद, गांधीनगर, सुरत आणि भावनगर या शहरांमधील २९ ठिकाणी शोधमोहीम राबवली. या कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. तसेच सुमारे २०० कोटी रुपयांची ट्रेडिंग खाती गोठवण्यात आली आहेत.
व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची दिशाभूल करून बेकायदेशीर नफा कमावल्याच्या आरोपांबाबत ईडीकडून पुढील तपास केला जात आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.









