नाट्यपदे, नाट्यप्रवेश, कविता आणि कथासादरीकरणातून रघुकाकांच्या आठवणींना उजाळा; रंगकर्मी आणि रसिकांची उपस्थिती
कणकवली (प्रतिनिधी) : ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शक स्व. रघुनाथ कदम ऊर्फ रघुकाका यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रघुप्रेमी परिवाराच्या वतीने आयोजित ‘रघु पर्व’ हा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला. मुलाखती, नाट्यपदे, नाट्यप्रवेश, कविता आणि कथासादरीकरण अशा विविध कलाप्रकारांतून रघुकाकांच्या रंगभूमीवरील योगदानाचे स्मरण करण्यात आले. सिंधुदुर्गातील रंगकर्मी, कलाकार, त्यांचे शिष्य आणि नाट्यरसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सायंकाळी सहा वाजता रघुनाथ कदम यांच्या जीवनप्रवासावरील चित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर पडदा उघडताच रंगमंचावर ठेवलेली रघुकाकांची खुर्ची, जॅकेट, सदरा आणि चप्पल, तसेच स्पॉटलाईटमध्ये उजळलेले त्यांचे छायाचित्र पाहून उपस्थित भावुक झाले. या मांडणीतून अनुपस्थितीतही रंगभूमीवर जाणवणारी रघुकाकांची उपस्थिती अनुभवायला मिळाली.
शरद सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे लेखक-दिग्दर्शक संभाजी सावंत यांनी ‘रघुनाथ कदम : नट, दिग्दर्शक आणि माणूस’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर निलेश पवार यांनी संभाजी सावंत यांची ‘रघुनाथ कदम : नाटक – लोकल टू ग्लोबल’ या विषयावर प्रकट मुलाखत घेतली.
या संवादात नाटकाचे सामाजिक मूल्य, दिग्दर्शकाची भूमिका, हौशी, प्रायोगिक, समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीचे स्वरूप तसेच प्रश्न विचारणाऱ्या नाटकांची आजच्या काळातील गरज या मुद्द्यांवर विचारमंथन झाले. रघुनाथ कदम यांनी पंचवीस वर्षे कोकणात जपलेला रंगभूमीचा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही करण्यात आले.
शिष्यवृंदाच्या कलासादरीकरणातून स्मृतींना उजाळा
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रघुनाथ कदम यांच्या शिष्यवृंदाने विविध कलाकृती सादर करून त्यांना आदरांजली वाहिली. प्रियंका मुसळे हिने ‘तुका म्हणे आता’ या नाटकातील नाट्यपद सादर केले. सुदिन तांबे यांनी संतूची भूमिका आणि गायनातून उपस्थितांची दाद मिळवली.
मंगल राणे आणि निलेश पवार यांनी अजय कांडर लिखित ‘कळत्या नकळत्या वयात’ या कवितेतील भाग सादर केला. प्राजक्ता वाडये हिने ‘भिंती’ या नाटकातील प्रवेश सादर केला, तर धनराज चंद्रकांत याने रघुकाकांनी दिग्दर्शित केलेली उदय प्रकाश लिखित हिंदी कथा ‘नेलकटर’ सादर केली. या सादरीकरणांतून रघुकाकांच्या कलात्मक दृष्टिकोनाची आणि त्यांच्या शिष्यांवर झालेल्या संस्कारांची आठवण जागी झाली.
सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली; अक्षर सिंधू साहित्य कला मंच, कणकवली; कलांकुर, मालवण; अष्टपैलू कलानिकेतन, मालवण; मित्र, शिरगाव; चैत्राली प्रोडक्शन; निलराज प्रोडक्शन आणि रंगखांब, कणकवली या संस्थांचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. रघुनाथ कदम यांनी ज्या सांस्कृतिक संस्थांसोबत काम केले होते, त्यांचे प्रतिनिधीही या वेळी सहभागी झाले.
शिष्यवृंदाचे नातेवाईक, रघुकाकांचे मित्र आणि चाहते यांच्यासह डॉ. राजेंद्र चव्हाण, प्रसाद घाणेकर, डॉ. सतीश आणि सई लळीत, विजय चव्हाण आदी सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे संभाजी सावंत यांचा सन्मान रंगकर्मी डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. सादरीकरण करणाऱ्या कलाकारांचा गौरव संभाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. राजेंद्र कदम यांनी आभार मानले, तर निलेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.












