दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी समाजात पाणी बचतीचा संदेश पोहोचवावा : प्रा. हसन खान
सिंधुदुर्ग महाविद्यालयात दुष्काळ जनजागृतीपर मार्गदर्शन
मालवण (प्रतिनिधी) : कोकणात प्रथमच मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची परिस्थिती जाणवत असून, एल निनोच्या प्रभावासोबतच भौगोलिक बदल आणि जंगलतोड यांसारखे घटकही त्यासाठी कारणीभूत आहेत. पावसाचे पाणी साठवणे, जलसंधारणाची कामे करणे, पाण्याचा काटकसरीने वापर आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण या उपाययोजनांद्वारे दुष्काळावर मात करता येऊ शकते. विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाबाबत जागरूक राहून समाजात पाणी बचतीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन पर्यावरणतज्ज्ञ व भूगोल अभ्यासक प्रा. हसन खान यांनी केले.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित दुष्काळ जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते होते. व्यासपीठावर एनसीसी अधिकारी डॉ. एम. आर. खोत, प्रा. संकेत बेळेकर आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक उपस्थित होते. डॉ. नाईक यांनी प्रास्ताविक केले.
दुष्काळाची कारणे आणि पर्यावरणीय परिणाम
प्रा. खान यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळाची कारणे, त्याचे पर्यावरणीय परिणाम आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे विश्लेषण केले. २०१५ मध्ये एल निनोचा प्रभाव असतानाही कोकणावर त्याचा तुलनेने कमी परिणाम झाला होता. मात्र, २०२६ मध्ये एल निनोच्या प्रभावासह विविध भौगोलिक बदलांमुळे कोकणातील परिसंस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
२०१५ ते २०२६ या काळात झालेले भौगोलिक बदल, सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील वृक्षतोड आणि जंगलांचे घटते आच्छादन यांचा नैसर्गिक जलचक्रावर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सह्याद्रीच्या जंगलांचे संरक्षण आणि नैसर्गिक परिसंस्थांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण कातळसडे आणि कातळ यांच्या पाणी साठवण क्षमतेचे महत्त्वही प्रा. खान यांनी विशद केले. या नैसर्गिक भूरचनांचे संवर्धन केल्यास पाण्याचे नियोजन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होऊ शकते, असे ते म्हणाले.
पाणी बचत प्रत्येकाची जबाबदारी
प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित केले. पाण्याचा वापर जाणीवपूर्वक आणि काटकसरीने करणे तसेच जलस्रोतांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संकेत बेळेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, अपूर्वा पालव, रिद्धी काजरेकर आणि हर्षद पाटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.












