शालेय आणि खुल्या गटांत रंगणार स्पर्धा; प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख २ डिसेंबर
कणकवली (प्रतिनिधी) : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली आयोजित प्रतिष्ठेची ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ ते २८ डिसेंबर २०२६ या कालावधीत कणकवली येथे होणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील नाट्यसंघांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाही स्पर्धेचे आयोजन शालेय आणि खुल्या अशा दोन गटांत करण्यात आले आहे. २४ व २५ डिसेंबर रोजी शालेय गटाच्या, तर २६, २७ व २८ डिसेंबर रोजी खुल्या गटाच्या एकांकिका सादर होतील.
आकर्षक रोख पारितोषिके
शालेय गटातील सांघिक विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ५०० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये अशी रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत.
खुल्या गटातील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ३० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये अशी रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात येतील. याशिवाय दिग्दर्शन, तांत्रिक आणि अभिनय विभागांतही स्वतंत्र रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत.
२ डिसेंबरपर्यंत प्रवेश नोंदणी
स्पर्धेसाठी शालेय गटाचे प्रवेश शुल्क १ हजार रुपये, तर खुल्या गटाचे प्रवेश शुल्क २ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख २ डिसेंबर २०२६ आहे. इच्छुक नाट्यसंघांनी प्रतिष्ठानच्या गुगल फॉर्मद्वारे प्रवेश नोंदणी पूर्ण करावी.
गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील हौशी रंगभूमीला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी आणि नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देणारी नाथ पै एकांकिका स्पर्धा ही राज्यातील महत्त्वपूर्ण सांस्कृतिक परंपरा आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या या स्पर्धेचे यंदाचे वर्ष विशेष उत्साहात साजरे करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.
अधिक माहितीसाठी आणि प्रवेश नोंदणीसाठी प्रतिष्ठानचे कार्यवाह शरद सावंत यांच्याशी ९४२२५८४०५४ किंवा ८८३०१८०८८५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.












