मंत्री उदय सामंत यांची घोषणा; मालवणी भाषेचा स्वतंत्र शब्दकोशही तयार करणार
सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक अस्मितेचा अविभाज्य भाग असलेल्या मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी जिल्ह्यात स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जिल्हा मराठी विकास केंद्रा’च्या माध्यमातून हे केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. मालवणी भाषेचे शास्त्रीय संशोधन, दस्तऐवजीकरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मंत्री सामंत यांनी ही घोषणा केली. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, एमआयडीसीचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. मालवणी संशोधन केंद्राची मागणी आमदार नीलेश राणे यांनी केली होती.
मालवणी भाषेतील समृद्ध शब्दसंपदा, साहित्य, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे जतन करण्यासाठी या केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मालवणी भाषेवर शास्त्रीय पद्धतीने संशोधन करून तिचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यावर भर दिला जाणार आहे.
मालवणीचा स्वतंत्र शब्दकोश तयार करणार
मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मराठीतील विविध बोलीभाषांचे शब्दकोश तयार करण्याचे काम सुरू आहे. याच उपक्रमांतर्गत मालवणी भाषेचा स्वतंत्र शब्दकोश तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
या शब्दकोशात मालवणी भाषेतील शब्द, म्हणी, वाक्प्रचार आणि भाषिक वैशिष्ट्यांचे संकलन व दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. यामुळे मालवणी बोलीभाषेचे जतन आणि पुढील पिढ्यांपर्यंत तिचे हस्तांतरण करण्यास मदत होणार आहे.
दशावतारासह लोककलांना मिळणार प्रोत्साहन
मालवणी भाषेच्या संवर्धनासोबतच सिंधुदुर्गची सांस्कृतिक ओळख असलेल्या दशावतारासारख्या लोककलांच्या जतन आणि संवर्धनालाही या केंद्राच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. स्थानिक लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि कलाकारांच्या योगदानाला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मालवणी भाषा, साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक वारशाचे संशोधन व जतन करणारे हे केंद्र सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवाला नवी दिशा देणारे ठरणार आहे. भाषेच्या संवर्धनासोबतच स्थानिक कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांनाही यामुळे प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.










