जखमी अवस्थेत आढळलेल्या समुद्री पक्ष्याला मच्छिमारांनी वाचवले; युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या मदतीने कांदळवन विभागाकडे सुपूर्द
मालवण (प्रतिनिधी) : दांडी येथील समुद्रात जखमी अवस्थेत आढळलेल्या दुर्मिळ ‘विल्सन स्टॉर्म पेट्रेल’ या समुद्री पक्ष्याला स्थानिक पारंपरिक मच्छिमारांनी सुखरूप वाचवले. बाबू उर्फ श्रीराम आडकर आणि नाना रोगे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या पक्ष्याचे प्राण वाचले. युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेच्या पुढाकारातून पक्ष्याला कांदळवन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
दांडी येथील पारंपरिक मच्छिमार मासेमारी करून परतत असताना श्रीराम आडकर यांना समुद्राच्या पाण्यात हा पक्षी जखमी अवस्थेत पडलेला दिसला. नाना रोगे यांनी तातडीने त्याला समुद्रातून बाहेर काढून श्रीकृष्ण उर्फ आबा आडकर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी नारायण आडकर आणि भूषण आडकर उपस्थित होते.
पक्षी आढळल्याची माहिती आडकर यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेला दिली. त्यानंतर संस्थेचे भार्गव खराडे आणि इकोमेट्सचे निखिल नेरकर यांनी घटनास्थळी पोहोचून पक्ष्याची पाहणी केली आणि कांदळवन विभागाला माहिती दिली. सिंधुदुर्ग वनक्षेत्रपाल महादेव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खराडे आणि नेरकर यांनी मानस आडकर यांच्याकडून पक्षी ताब्यात घेऊन कांदळवन विभागाच्या कार्यालयात सुखरूप सुपूर्द केला.
अंटार्क्टिकातून हिंदी महासागरात येणारा स्थलांतरित पक्षी
‘विल्सन स्टॉर्म पेट्रेल’ (Wilson’s Storm-Petrel) हा आकाराने लहान असला, तरी समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेणारा वैशिष्ट्यपूर्ण समुद्री पक्षी आहे. त्याची लांबी साधारण १७ ते १९ सेंटीमीटर, तर पंखांचा विस्तार ३८ ते ४१ सेंटीमीटर असतो. त्याचे शरीर गडद तपकिरी-काळसर असून शेपटीजवळ ठळक पांढरा डाग असतो. चोच लहान, काळी आणि टोकदार असते.
या पक्ष्याच्या चोचीच्या वरच्या बाजूला नाकपुड्यांवर नळीप्रमाणे रचना असते. ही रचना ‘ट्यूबनोज’ (Tubenose) समुद्री पक्ष्यांचे वैशिष्ट्य आहे. समुद्राच्या पृष्ठभागावरून अन्न टिपताना ही रचना त्याला मदत करते.
पाण्यावर चालत असल्याचा भास
विल्सन स्टॉर्म पेट्रेल हा समुद्राच्या पृष्ठभागाजवळ उडत क्रिल, छोटे मासे, स्क्विड आणि इतर सूक्ष्म समुद्री जीव खातो. अन्न टिपताना तो पायांनी पाण्याच्या पृष्ठभागाला हलकेच स्पर्श करतो. त्यामुळे तो पाण्यावर चालत असल्याचा भास निर्माण होतो. काही वेळा अन्नाच्या शोधात तो जहाजांच्याही मागे येतो.
अंटार्क्टिकातून महासागरांमध्ये स्थलांतर
हा पक्षी अंटार्क्टिका आणि आसपासच्या बेटांवर प्रजनन करतो. प्रजननानंतर अटलांटिक, हिंदी आणि पॅसिफिक महासागरांमध्ये विषुववृत्त ओलांडून उत्तरेकडे स्थलांतर करतो. त्यामुळे भारतीय किनारपट्टीवर त्याचे दर्शन हे समुद्री पक्ष्यांच्या स्थलांतराच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.
खडकांच्या भेगांमध्ये किंवा बिळांत घरटे करून हा पक्षी साधारणतः एकच अंडे घालतो. नर आणि मादी दोघेही अंडे उबवण्याची जबाबदारी पार पाडतात, अशी माहिती युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेने दिली.
दुर्मिळ समुद्री पक्ष्याच्या बचावासाठी स्थानिक मच्छिमार, पर्यावरणप्रेमी आणि वनविभागाने दाखवलेली तत्परता समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.











