चिपी–नवी मुंबई मार्गाचे बुकिंग सुरू; कोकणच्या आर्थिक विकासाला गती मिळणार – विष्णू मोंडकर
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या चिपी (SDW) ते नवी मुंबई (NMI) या बहुप्रतीक्षित विमानसेवेचा प्रारंभ १६ नोव्हेंबर २०२६ पासून होणार आहे. FLY91 या विमान कंपनीकडून सकाळच्या सत्रात नियमित उड्डाणे सुरू करण्यात येणार असून, या मार्गावरील विमान प्रवासाचे बुकिंग कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळासह प्रमुख ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवर सुरू झाले आहे. या विमानसेवेमुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग ते नवी मुंबई हा हवाई मार्ग जिल्ह्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगत मोंडकर यांनी त्यांचे आभार मानले.
पर्यटनाला आंतरराष्ट्रीय जोडणी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे मोठे केंद्र विकसित होत आहे. या केंद्राशी सिंधुदुर्ग थेट जोडला गेल्याने देश-विदेशातील पर्यटकांना जिल्ह्यात पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.
मुंबई आणि नवी मुंबईहून रस्ते व रेल्वेने प्रवास करताना लागणारा वेळ वाचणार असल्याने पर्यटकांना कमी कालावधीत सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांचा आनंद घेता येईल. ऐतिहासिक किल्ले, नयनरम्य समुद्रकिनारे, स्कूबा डायव्हिंग आणि कोकणची समृद्ध संस्कृती यांचा अनुभव घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
स्थानिक व्यवसायांना चालना, रोजगाराच्या संधी
मुंबई आणि नवी मुंबई ही देशातील महत्त्वाची आर्थिक व व्यापारी केंद्रे आहेत. या शहरांशी थेट हवाई संपर्क निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन आणि अन्य उद्योगांमध्ये गुंतवणुकीच्या संधी वाढतील.
पर्यटकांची संख्या वाढल्यास हॉटेल्स, होमस्टे, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स, स्थानिक वाहतूक, पर्यटन मार्गदर्शक, काजू-आंबा व्यवसाय आणि हस्तकला क्षेत्राला फायदा होईल. पर्यटनाचा विस्तार झाल्याने स्थानिक तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
‘रिव्हर्स मायग्रेशन’ला बळ
पालकमंत्री नितेश राणे यांनी मांडलेल्या ‘रिव्हर्स मायग्रेशन’ अर्थात उलट स्थलांतराच्या संकल्पनेला ही विमानसेवा बळ देणारी ठरेल, असे मोंडकर यांनी नमूद केले.
रोजगारासाठी मुंबई, पुणे आणि अन्य शहरांत गेलेल्या कोकणातील तरुणांना आपल्या गावात परतून पर्यटन, आदरातिथ्य आणि स्थानिक व्यापार क्षेत्रात उद्योग उभारण्याची संधी मिळू शकते. स्वगावी रोजगार आणि मोठ्या शहरांशी थेट संपर्क उपलब्ध झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून ग्रामीण भागातील आर्थिक समृद्धी वाढण्यास मदत होईल.
FLY91च्या टीमचे अभिनंदन
सिंधुदुर्ग चिपी विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारी सेवा सुरू केल्याबद्दल FLY91च्या संपूर्ण टीमचे पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्गच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केला.











