परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यात अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली मालवण पोलिसांकडून सातत्याने छापे टाकण्यात येत असल्याने अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रात्री मालवण येथील धुरीवाडा परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी गोवा बनावटीची तब्बल १ लाख ५६ हजार रुपये किमतीची दारू जप्त केली.
मालवण तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री आणि साठवणूक रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी रात्री धुरीवाडा येथे अवैध दारूसाठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत गोवा बनावटीची १ लाख ५६ हजार रुपये किमतीची दारू आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करत संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांनी या कारवाईचे नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, हेड कॉन्स्टेबल सुप्रिया पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमिता चव्हाण यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वी केली.
दरम्यान, मालवणमध्ये अवैध दारू व्यवसायाविरोधात केवळ एखाद्या तक्रारीनंतर कारवाई करण्याऐवजी सातत्याने छापे टाकण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये कारवाईची धास्ती निर्माण झाली आहे.
अवैध दारूची साठवणूक, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांची ही मोहीम पुढेही सुरू राहणार का, याकडे आता तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.











