बालकृष्णाच्या विविध रूपांनी भरडनाका सजला; हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचा अभिनव उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : बालकृष्णाच्या निरागस लीला, श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे दर्शन आणि भारतीय संस्कृतीचा जागर… अशा भक्तिमय वातावरणात मालवणच्या भरडनाका येथे आयोजित भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत लहानग्यांपासून मोठ्या वयोगटातील बालकलाकारांनी श्रीकृष्णाच्या विविध रूपांतून उपस्थितांची मने जिंकली. लहान गटात अनुश्री सुभाष मेस्त्री हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर मोठ्या गटात गुरु तुळसकर आणि आरव यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा तब्बल चार तास रंगली. अवघ्या एक वर्षाच्या बालकांपासून विविध वयोगटांतील स्पर्धकांनी बालकृष्ण, मुरलीधर आणि श्रीकृष्ण चरित्रातील विविध प्रसंग वेशभूषा आणि सादरीकरणातून जिवंत केले. स्पर्धकांचा उत्साह, पालकांची लगबग आणि बालकृष्णाची मनोहारी रूपे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. ज्योती तोरसकर यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील संकल्पना स्पष्ट करत भारतीय संस्कृती, परंपरा आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे महत्त्व विशद केले. उद्घाटनप्रसंगी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, संयोजक अमित खोत, सहसंयोजक भाऊ सामंत, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख राजू बिडये, ज्येष्ठ नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, अश्विनी कांदळकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगरसेवक रवीकिरण तोरसकर, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, उमेश मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई आणि शिक्षक प्रभुदास आजगावकर यांनी केले. स्पर्धकांच्या वेशभूषेतील कल्पकता, सादरीकरणातील वैशिष्ट्ये आणि श्रीकृष्ण चरित्रातील प्रसंगांचे चित्रण यामुळे स्पर्धेत रंगत निर्माण झाली. मोठ्या एलईडी स्क्रीनवरून सादरीकरण दाखविण्यात आल्याने प्रेक्षकांना कार्यक्रमाचा आनंद घेता आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.
संस्कृतीच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज
नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना भारतीय संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन करण्यासाठी अशा स्पर्धांची आवश्यकता असल्याचे सांगितले. बालवयातच मुलांना आपल्या संस्कृतीची, धार्मिक परंपरांची आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीने सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
डॉ. ज्योती तोरसकर यांनी भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे महत्त्व स्पष्ट केले. नरकचतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी नरकासुराच्या प्रतिमांचे उदात्तीकरण होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी श्रीकृष्णाच्या चरित्रातील आदर्श, त्यांचे कार्य आणि सांस्कृतिक मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विजेत्यांना सन्मानचिन्ह, रोख बक्षिसे आणि भेटवस्तू
लहान गटातील बक्षिसे महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी, तर मोठ्या गटातील बक्षिसे स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी पुरस्कृत केली. सामाजिक कार्यकर्ते भूषण मेस्त्री यांनी सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन प्रोत्साहन दिले. विजेत्यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेचा निकाल
लहान गट :
- प्रथम : अनुश्री सुभाष मेस्त्री
- द्वितीय : नेत्रा नितीन माणगावकर
- तृतीय : ओजस रोहित पाटकर
- उत्तेजनार्थ : प्रभाकर रुपेश धुरी, युगांश स्वप्नील केळूसकर, समर्थ विवेक कोरगावकर, रियांश कामतेकर आणि अन्वित अश्विन भोगले.
- विशेष वेशभूषा सादरीकरण : समर्थ गणेश सातार्डेकर आणि सारा प्रवीण पवार.
मोठा गट :
- प्रथम : गुरु तुळसकर आणि आरव
- द्वितीय : हार्दिक परुळेकर आणि गजानन मांजरेकर
- तृतीय : रेवा सुहास जोशी
- उत्तेजनार्थ : सई सुखानंद कांबळी आणि सचिन वराडकर.
स्पर्धेदरम्यान नाट्यदिग्दर्शक गणेश मेस्त्री यांच्या संकल्पनेतून रेवा जोशी यांनी दोन नृत्ये सादर केली. त्यांच्या नृत्याविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
समितीच्या नियोजनातून स्पर्धा यशस्वी
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे संयोजक अमित खोत, सहसंयोजक भाऊ सामंत आणि समितीच्या सर्व सदस्यांनी नागरिकांच्या सहकार्याने या स्पर्धेचे नियोजन केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, पुनम चव्हाण, अन्वेषा आचरेकर, राजू बिडये, बबन शिंदे, बंटी केनवडेकर, अमृता फाटक, अनिकेत फाटक, हरेश फडते, गणेश मेस्त्री, प्रशांत हिंदळेकर, गणेश चव्हाण, बबन परुळेकर, महेश कांदळगांवकर, शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, ऋषी पेणकर, गुरुनाथ राणे, शिल्पा खोत, अंजली केनवडेकर, विकी तोरसकर, विराज आचरेकर, निखिल वस्त, शेखर मोर्वेकर, भूषण मेस्त्री, सुहास गवाणकर, सौगंध बादेकर, निलेश गवंडी, डॉ. श्रीपाद गिरसागर, नारायण धुरी, साईराज चव्हाण, अविनाश सामंत, प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, तेजस चव्हाण, शुभम मेस्त्री आणि रुपेश हळदणकर यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमस्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे मोठी गर्दी असूनही कार्यक्रम सुरळीत पार पडला.
भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातील आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि भारतीय संस्कृतीचा वारसा जपणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे मान्यवर, पालक आणि नागरिकांनी विशेष कौतुक केले.












