सत्यनारायण महापूजा, रक्तदान शिबिर, दिंडी भजन आणि दशावतारी नाट्यप्रयोगाची मेजवानी
मालवण | प्रतिनिधी : श्री देव रामेश्वर-नारायण पालखी सोहळ्याचे औचित्य साधून आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशन, एसटी स्टँड मालवण यांच्या वतीने मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण एसटी स्टँड येथे सत्यनारायण महापूजेसह रक्तदान शिबिर, भजन आणि दशावतारी नाट्यप्रयोगाची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत आयोजित रक्तदान शिबिराने होणार आहे. दुपारी २ वाजल्यापासून भाविकांसाठी तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वाजता किर्लोस गावठणवाडी येथील गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा मंगेश घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडी भजन सादर होणार आहे. रात्री ७ वाजता उभादांडा येथील पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘शूरवीर बर्बरीक’ हा दशावतारी नाट्यप्रयोग रंगणार आहे.
धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच सर्व भाविकांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.











