वीरा वारंगची दुहेरी विजेतेपदासह चमकदार कामगिरी; १५/१७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद
मालवण (प्रतिनिधी) : इंडियन ऑइल पुरस्कृत आणि महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग व मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत खुल्या पुरुष एकेरी गटात चंद्रकांत साळवे, तर खुल्या महिला एकेरी गटात वीरा वारंग यांनी विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, वीरा वारंग हिने ११/१३ वर्षांखालील मुलींच्या गटातही विजेतेपद मिळवत स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केला. तसेच १५/१७ वर्षांखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळवले.
मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉलमध्ये १४ व १५ नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध वयोगटांतील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेत आपले कौशल्य प्रदर्शित केले.
स्पर्धेच्या निकालात ११/१३ वर्षांखालील मुलींच्या गटात वीरा वारंग विजेती, तर धनश्री परब उपविजेती ठरली. मुलांच्या याच वयोगटात नाहुश पारगावकर याने विजेतेपद, तर श्री सारंग याने उपविजेतेपद मिळवले. १५/१७ वर्षांखालील मुलींच्या गटात वर्षा परुळेकर विजेती, तर वीरा वारंग उपविजेती ठरली. मुलांच्या गटात लौकिक तळवडेकर याने विजेतेपद, तर योगेश परुळेकर याने उपविजेतेपद पटकावले.
महिला एकेरीत वीरा वारंग हिने वर्षा परुळेकर हिच्यावर मात करत विजेतेपद मिळवले. पुरुष एकेरीत चंद्रकांत साळवे यांनी राजाराम वालावलकर यांना मागे टाकत विजेतेपदावर नाव कोरले. मिश्र दुहेरीत गणेश भट व लौकिक तळवडेकर यांनी विजेतेपद, तर वर्षा परुळेकर व चंद्रकांत साळवे यांनी उपविजेतेपद मिळवले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महासिंधू टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगांवकर, सचिव हेमंत वालकर, कोषाध्यक्ष नितीन तळेकर, विश्वस्त शुभम मुळीक आणि उद्योजक दिलीप हुनारी यांच्या हस्ते झाला. विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्रे, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. बाल वयोगटातील श्लोक हुनारी, परिन अमरे, रुही कांबळी आणि सृष्टी सुकाळे यांचा विशेष खेळाडू म्हणून सन्मान करण्यात आला.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विलास परुळेकर आणि क्षितिज हुनारी यांनी विशेष मेहनत घेतली. योगेश परुळेकर, क्षितिज हुनारी, पावनी मालणकर आणि प्रतिभा परुळेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. सामन्यांच्या संयोजनाची जबाबदारी हेमंत वालकर यांनी सांभाळली. स्पर्धा यशस्वी झाल्याबद्दल अध्यक्ष विष्णू कोरगांवकर यांनी सर्व खेळाडू, पंच आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. तसेच इंडियन ऑइलप्रति कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी केले.










