हॉटेलमधील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने हॉटेलमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. गणेश विजय कदम (वय ३३, रा. कांदळगाव बौद्धवाडी, ता. मालवण) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कदम हा गेल्या वर्षभरापासून मालवण येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. रविवारी रात्री सुमारे दीड वाजेपर्यंत त्याने हॉटेलमधील पाणी भरण्याचे काम केले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हॉटेल मालकाला एका खोलीत गणेशचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. खोलीतील बेड रनरच्या कापडाच्या साहाय्याने त्याने पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी खोलीतील एसी सुरू होता, तसेच दरवाजा उघडा असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच मालवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार, पोलीस उपनिरीक्षक भगत, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर आणि जितेंद्र पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, गणेशला नृत्याची विशेष आवड होती. तो सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर आपल्या नृत्याचे व्हिडीओही पोस्ट करत असे. त्याच्या अचानक जाण्याने कांदळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई आणि बहीण असा परिवार आहे. गणेशने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास मालवण पोलीस करीत आहेत.











