मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे भीषण अपघात; ‘तुटलेपण बांधून घेताना’च्या कवयित्री काळाच्या पडद्याआड
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मराठी साहित्यविश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ कवयित्री आणि समीक्षक प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांचे गुरुवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्या राजापूरहून परत येत असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी साहित्यविश्वासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रा. डॉ. शरयू आसोलकर या मराठी कवितेतील संवेदनशील आणि सशक्त आवाज म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या कवितेत स्त्रीमनातील भावविश्व, अंतर्मनातील तगमग, नात्यांमधील तुटलेपण आणि त्या तुटलेपणातून पुन्हा उभे राहण्याची जिद्द प्रभावीपणे व्यक्त होत असे. इंदिरा संत यांच्या कवितेच्या परंपरेशी नाते सांगणारी भावगर्भ आणि तरल कविता हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.
कवयित्री म्हणून स्वतंत्र ठसा उमटवतानाच त्यांनी समीक्षक म्हणूनही मराठी साहित्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. कवितेकडे केवळ भावनिक दृष्टिकोनातून न पाहता तिचे आशयविश्व, अभिव्यक्ती आणि साहित्यिक मूल्ये यांचा चिकित्सक वेध घेण्याची त्यांची दृष्टी त्यांच्या समीक्षेतून दिसून येत असे.
त्यांचा ‘तुटलेपण बांधून घेताना’ हा काव्यसंग्रह विशेष गाजला. या संग्रहासाठी त्यांना राज्य शासनाचा केशवसुत पुरस्कार, विशाखा पुरस्कार आणि आवानओल प्रतिष्ठानचा कवी वसंत सावंत पुरस्कार यांसह विविध मानाचे पुरस्कार प्राप्त झाले होते. गेल्या वर्षी त्यांनी संपादित केलेला ‘ओल अनमोल आवानओल’ हा समीक्षा ग्रंथही प्रकाशित झाला होता.
कवितेतील भावनिक ओल, स्त्रीमनाचे सूक्ष्म पदर आणि जगण्याकडे पाहण्याची चिंतनशील दृष्टी यांमुळे शरयू आसोलकर यांनी मराठी साहित्यविश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अकाली निधनाने मराठी कवितेतील एक संवेदनशील, चिंतनशील आणि मायाळू लेखणी हरपली आहे. त्यांच्या साहित्यकृतींच्या माध्यमातून त्यांचा काव्यस्वर मात्र वाचकांच्या मनात कायम जिवंत राहील.











