नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन; २९ नोव्हेंबरपर्यंत १२ नाटकांची मेजवानी
मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपण्यात रंगभूमीचे योगदान अनन्यसाधारण आहे. संगीत नाटकांपासून प्रायोगिक आणि आधुनिक रंगभूमीपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असून, मालवण ही कलेची भूमी आहे. अशा कलासंपन्न मालवणमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा होत असल्याचा विशेष अभिमान आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील हौशी कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम ही स्पर्धा करत आहे, असे प्रतिपादन मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मालवण केंद्रावरील प्राथमिक फेरीला मामा वरेरकर नाट्यगृहात प्रारंभ झाला. नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, राज्य नाट्य स्पर्धा समन्वयक संजय शिंदे, परीक्षक डॉ. विशाखा शिरवाडकर, डॉ. शशिकांत चौधरी, ज्येष्ठ रंगकर्मी नरेंद्र आंगणे, भजनसम्राट भालचंद्र केळूसकर, अखिल भारतीय नाट्य परिषद मालवण शाखेचे अध्यक्ष प्रकाश कुशे, नाट्य समीक्षक विनायक कोळंबकर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, शिवराज मंच मालवणचे भूषण साटम, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजू बिडये आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी संजय शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून स्पर्धेचे प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना नगराध्यक्षा ममता वराडकर म्हणाल्या की, रंगभूमी माणसाला जगण्याची कला शिकवते. मनोरंजनासोबतच समाजप्रबोधन आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रंगभूमी करत असते. बदलत्या काळात आणि धकाधकीच्या जीवनशैलीतही रंगभूमीची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आजचे हौशी कलाकार निष्ठेने प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेत सादर होणारी प्रत्येक कलाकृती नाट्यरसिकांच्या मनाचा ठाव घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘विकेटकीपर’ या नाटकाने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ झाला. या स्पर्धेत २९ नोव्हेंबरपर्यंत विविध नाट्यसंस्थांची एकूण १२ नाटके सादर होणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात नाट्यरसिकांना विविध विषय, आशय आणि नाट्यप्रयोगांचा आस्वाद घेता येणार आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी अक्षय सातार्डेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचा वारसा जपत हौशी कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारी ही नाट्यस्पर्धा मालवणच्या सांस्कृतिक विश्वात रंगत निर्माण करणार आहे.












