ओरोस येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे बालदिन कार्यक्रम उत्साहात
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासह त्यांना आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव व्हावी आणि मोबाईलचा योग्य वापर करण्याची सवय लागावी, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदळी, लिपिक श्वेता सावंत, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बालम, शिक्षिका तेजस्विनी पाटील, संजीव राणे आणि गोसावी उपस्थित होते.
कार्यक्रमात सचिव आर. व्ही. नडगदळी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार, विविध मूलभूत अधिकार, घटनात्मक सक्षमीकरण आणि बालदिनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या हक्कांची जाणीव ठेवणे आणि त्या हक्कांचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कायद्याची माहिती आणि हक्कांविषयीची जागरूकता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
लिपिक श्वेता सावंत यांनी मोबाईलच्या योग्य वापरावर विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम, त्याच्या आहारी न जाता अभ्यास आणि जीवनातील ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. मोबाईलचा विवेकी वापर करून यशस्वी होण्याबरोबरच जबाबदार आणि चांगले नागरिक कसे बनावे, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन संजीव राणे यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जाणीव, हक्कांविषयी जागरूकता आणि तंत्रज्ञानाच्या जबाबदार वापराची समज निर्माण करण्याच्या दृष्टीने हा बालदिन कार्यक्रम उपयुक्त ठरला.










