ओरोस येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजन; पोलीस, अग्निशमन, आरोग्य यंत्रणांसह विविध विभागांचा सहभाग
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सज्जता वाढविणे, विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय तपासणे आणि आपत्तीच्या वेळी प्रभावी प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करणे, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी नागरी संरक्षण मॉकड्रिल आणि ब्लॅकआउट सराव आयोजित करण्यात येणार आहे. ओरोस येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हा सराव होणार आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान मिळालेल्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी समाजाची सज्जता आणि तातडीने प्रतिसाद देण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २०२६ या वर्षात दोन वेळा नागरी संरक्षण मॉकड्रिल (Civil Defence Exercise) आणि ब्लॅकआउट सराव आयोजित करण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा सराव घेण्यात येणार आहे.
या मॉकड्रिलमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागरी संरक्षण स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक, पोलीस यंत्रणा, अग्निशमन दल, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका सेवा, होमगार्ड यंत्रणा, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक सहभागी होणार आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, विविध यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कशा प्रकारे काम करावे आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी कितपत तयारी आहे, याची जाणीव करून देणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी गोंधळ टाळून नियोजनबद्ध आणि तातडीने प्रतिसाद देण्यासाठी अशा सरावांचे महत्त्व आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी या मॉकड्रिलची माहिती घेऊन आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूक राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











