अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेची घोषणा; २६ वर्षांच्या संशोधन कार्याची दखल
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) — सिंधुदुर्गातील कातळशिल्प संशोधनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी गेली २६ वर्षे सातत्याने कार्यरत असलेले कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांना २०२६चा ज्येष्ठ इतिहास संशोधक पं. सेतुमाधवराव पगडी पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. नामदेव गरड आणि सचिव प्राचार्य डॉ. सोपान जावळे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण इतिहास संशोधनाची दखल घेण्यासाठी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेतर्फे २०२३पासून थोर इतिहास संशोधक, विचारवंत आणि लेखक पं. सेतुमाधवराव पगडी यांच्या नावाने हा पुरस्कार प्रदान केला जातो. परिषदेच्या कार्यकारी मंडळाची नुकतीच कोल्हापूर येथे बैठक झाली. या बैठकीत सतीश लळीत यांच्या कातळशिल्प क्षेत्रातील संशोधन, अर्थान्वयन, संवर्धन आणि प्रसार या कार्याची दखल घेत त्यांच्या नावावर पुरस्कारासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले.
परिषदेचे कार्यकारी मंडळाचे कोकण विभाग प्रतिनिधी व सदस्य प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी ओरोस येथील लळीत यांच्या निवासस्थानी सदिच्छाभेट देत त्यांना परिषदेचे निवडपत्र प्रदान केले.
कर्जत येथे होणार पुरस्कार प्रदान
अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३४वे राष्ट्रीय अधिवेशन रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय, कर्जत, जि. अहिल्यानगर येथे ८ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे. या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते सतीश लळीत यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि सात हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
२६ वर्षांचा कातळशिल्प संशोधनाचा प्रवास
महाराष्ट्र शासनात विविध उच्च पदांवर काम केलेले निवृत्त अधिकारी सतीश लळीत गेली २६ वर्षे कातळशिल्पांच्या संशोधनासाठी कार्यरत आहेत. ६ मे २००१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिवाळे, ता. मालवण येथे कातळशिल्पाचे पहिले ठिकाण शोधून काढत त्यांनी या विषयाला व्यापक प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर कुडोपी, खोटले, मोगरणे-धामापूर यांसह अनेक ठिकाणी आढळलेल्या कातळशिल्पांचा शोध, अभ्यास आणि प्रसार त्यांनी केला.
कातळशिल्प विषयावरील त्यांचे संशोधन देश-विदेशातील अभ्यासकांपर्यंत पोहोचले असून मुंबई, पुणे तसेच कर्नाटक आणि राजस्थान येथे झालेल्या विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरातत्त्व परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत.
कुडोपी येथील कातळशिल्प स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीत समावेश होणे ही या संशोधन क्षेत्रातील महत्त्वाची बाब मानली जाते. लळीत यांनी कुडोपी आणि खोटले येथे शोधलेले मातृदेवतेचे कातळशिल्प तसेच मोगरणे-धामापूर येथील पश्चिम किनारपट्टीवरील वैशिष्ट्यपूर्ण शिकारशिल्प विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
‘कातळशिल्प विषयाला परिषदेने न्याय दिला’
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सतीश लळीत यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “मी अत्यंत विनम्रतेने हा पुरस्कार स्वीकारत आहे. माझ्या कार्याची दखल घेताना काहीसा उपेक्षित राहिलेल्या कातळशिल्प विषयाला परिषदेने न्याय दिला आहे. हा पुरस्कार माझी जबाबदारी वाढविणारा आहे. या पुरस्काराबद्दल अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे आभार,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पं. सेतुमाधवराव पगडी हे इतिहास संशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार तसेच प्रशासक म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार कातळशिल्प संशोधनासाठी मिळाल्याने सिंधुदुर्गच्या प्राचीन वारशाच्या अभ्यासाला आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण अधोरेखित मिळाले आहे.











