मालवण (प्रतिनिधी) : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावपातळीवर आतापासूनच पाणी साठवणुकीसाठी योग्य ठिकाणे निश्चित करून कच्चे बंधारे उभारण्याबाबत ग्रामपंचायतींनी कार्यवाही करावी. तसेच पाणीटंचाई निवारणासाठी प्रत्येक ग्रामस्थाने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुमेधा पाताडे यांनी केले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघाची आढावा बैठक पोईप येथील पोईप हायस्कूलच्या सभागृहात सुमेधा पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, पंचायत समिती सदस्य संतोष गावडे, पोईप सरपंच श्रीधर नाईक, आमडोस सरपंच सुबोधिनी परब, कृषी विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, आरोग्य विस्तार अधिकारी सूरज बांगर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सुमेधा पाताडे म्हणाल्या की, मागील काही वर्षांत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीटंचाईची परिस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवली नव्हती. मात्र यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिल्याने आगामी काळात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार कच्चे बंधारे उभारण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतींनी नियोजन करावे.
गावातील राजकारण आणि आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पाणी साठवणुकीची कामे प्रभावीपणे राबवून शासनाने निर्धारित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी दुष्काळी परिस्थितीत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये समन्वय राहण्याची आवश्यकता व्यक्त केली. तलाठ्यांनी संकटकाळात ग्रामस्थांच्या सेवेसाठी तसेच सातबारा पूर्ततेसाठी आठवड्यातील किमान दोन दिवस कार्यालयात उपलब्ध राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कृषी विभाग, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी दुष्काळी परिस्थिती तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे जबाबदारीने पूर्ण करावेत. शेतीची पीक पाहणी करून पाणी अडविण्यासाठी वनराई बंधारे उभारण्याचे नियोजन करावे, असेही निर्देश प्रज्ञा चव्हाण यांनी दिले.
बैठकीत तहसीलदार गणेश लव्हे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत स्तरावर पाणी उपलब्धता, साठवणूक आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्यावर यावेळी भर देण्यात आला.












