मालवण (प्रतिनिधी)
वडाचापाट-बौद्धवाडी येथील रहिवासी आणि सध्या कोळंब-कातवड येथे वास्तव्यास असलेले भूविकास बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश सुरेश कासले (६२) यांचे सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान पडवे येथे निधन झाले.
सतीश कासले यांनी भूविकास बँकेत प्रदीर्घकाळ सेवा बजावली होती. निवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. भारतीय बौद्ध महासभा, गाव शाखा वडाचापाटचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे परिसरात त्यांचा परिचय होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ, भावजय, बहीण, पुतणे, पुतणी असा परिवार आहे.
सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीचे मालवण समतादूत व पत्रकार संग्राम कासले तसेच मालवण न्यायालयातील कनिष्ठ लिपिक सुविधा जाधव यांचे ते वडील होत. विवेक जाधव यांचे ते सासरे होत.
सतीश कासले यांच्या निधनाने कासले कुटुंबीय तसेच बौद्ध समाज आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.










