सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात याव्यात, अशी मागणी कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
नाईक यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दुष्काळाच्या यादीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने आणि उन्हाची तीव्रता वाढल्याने तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत असून विद्यार्थ्यांनाही वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांचे वेळापत्रक दुपारच्या सत्रात असल्याने विद्यार्थ्यांना कडक उन्हात शाळेत ये-जा करावी लागत आहे. वाढती उष्णता विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शालेय शिक्षण विभागाने तातडीने योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नाईक यांनी पत्रात नमूद केले आहे.
उन्हाच्या तीव्रतेपासून विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळावा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात घेण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी वैभव नाईक यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.











