अभिवाचन, संवाद, संगीत आणि तालवाद्याच्या साथीने अनोखे सादरीकरण; रसिकांकडून भरभरून दाद
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हळवल येथे ‘आपली सिंधुनगरी’ न्यूज चॅनेल निर्मित व प्रस्तुत ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ या अभिवाचन अनुभव कार्यक्रमाचा प्रयोग उत्साहात पार पडला. हळवल येथील निलायम कृष्णकक्ष येथे रविवारी, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या प्रयोगाला कणकवलीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘आपली सिंधुनगरी’ न्यूज चॅनेलच्या सहसंपादक सानिका वायंगणकर यांनी उपस्थित मान्यवर आणि रसिकांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांचे आहे. कार्यक्रमात आजीच्या भूमिकेत वैशाली पंडित, आजोबांच्या भूमिकेत संजय शिंदे, सूत्रधार म्हणून अक्षय सातार्डेकर, सहकलाकार म्हणून डॉ. सुमेधा नाईक यांनी सहभाग घेतला. तालवाद्याची साथ वैभव मांजरेकर यांनी दिली, तर संगीत संयोजन विरेश वळंजू यांनी केले.
अभिवाचन, संवाद, संगीत आणि तालवाद्य यांचा सुरेख मिलाफ साधत सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून कथानुभव अधिक प्रभावी आणि जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विषयातील मार्मिकता, कलाकारांचे प्रभावी अभिवाचन आणि संगीताची साथ यामुळे कार्यक्रमाला वेगळे सौंदर्य प्राप्त झाले. उपस्थित रसिकांनी या अनोख्या प्रयोगाचे विशेष कौतुक केले.
सुप्रसिद्ध अभिनेते अभय खडपकर, सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी, लेखक महेश काणेकर, तसेच निमंत्रक स्वर्गानंद टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सच्या गीता कामत आणि डॉ. वैशाली कोरगावकर, संपदा प्रभुदेसाई यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली. अभिवाचनाच्या माध्यमातून कथानुभव रसिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयोग असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
‘उत्तरचंद्राची कोजागिरी’चा प्रयोग सिंधुदुर्गापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रासह देश-विदेशातील रसिकांपर्यंत पोहोचावा, अशा सदिच्छाही यावेळी मान्यवर आणि रसिकांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला निमंत्रक स्वर्गानंद टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सच्या गीता कामत, डॉ. वैशाली कोरगावकर, त्रिंबक आजगावकर, देवयानी आजगावकर, दिनेश गोगटे, मेघा गोगटे, महेश सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निलायम कृष्णकक्षचे वामन पंडित आणि ज्योती पंडित, तसेच ध्वनीसंयोजक श्री. डंबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे ‘आपली सिंधुनगरी’ न्यूज चॅनेलच्या वतीने आभार मानण्यात आले.
दरम्यान, ‘आपली सिंधुनगरी’ न्यूज चॅनेलचे विशेष सांस्कृतिक समन्वयक त्रिंबक आजगावकर आणि देवयानी आजगावकर यांनी ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’च्या आगामी प्रयोगांची माहिती दिली. मालवण येथील दत्त मंदिर, भरड येथे ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, तसेच वेंगुर्ले येथील बॅरिस्टर नाथ पै संकुल येथे ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पुढील प्रयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी प्रयोगांसाठी संपूर्ण संच सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.












