तालुकास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मालवणचे प्रतिनिधित्व करणार
मालवण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि मालवण तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल, आचरा येथे १७ वर्षांखालील मुलींच्या मालवण तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनंत शिवाजी देसाई टोपीवाला प्रशालेच्या मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर टोपीवाला प्रशालेचा विजेता संघ आता आगामी जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विजेत्या संघाला शाम वारंग आणि रेनॉल्ड भूतेलो यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सांघिक खेळ, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.
संघाच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, पर्यवेक्षक देवीदास वेरलकर, एस. बी. वाकुडे, मालवण एज्युकेशन सोसायटीचे सचिव विजय कामत तसेच ज्येष्ठ सदस्य दिगंबर सामंत यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या.











