जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह पत्रकार, विद्यार्थी, ग्रामस्थांचा सहभाग; श्रमदानातून जलसाक्षरतेचा संदेश
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आशिये ग्रामपंचायत आणि कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आशिये-टेंबवाडी येथे वनराई बंधारा उभारण्यात आला. ‘पाणी हेच जीवन असून, त्याचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,’ हा संदेश देत पत्रकार, प्रशासन, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि महिला शेतकरी गटांनी या उपक्रमात प्रत्यक्ष श्रमदान केले. पत्रकारांनी पुढाकार घेत उभारलेल्या या वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून समाजासमोर जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला आहे.
या उपक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि महिला शेतकरी गटांच्या सदस्यांसोबत श्रमदान केले. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सरपंच महेश गुरव, तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामचंद्र शिंदे, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी प्रवीण ठाकूर, उपसरपंच संदीप जाधव आदी उपस्थित होते.
जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव बाळ खडपकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे, उपाध्यक्ष नितीन कदम, तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, रमेश जोगळे, माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई, वीरेंद्र चिंदरकर, महेश सरनाईक, आनंद तांबे, राजन चव्हाण, सुधीर राणे, संजय बाणे, रमाकांत बाणे, तुषार हजारे, विराज गोसावी, दर्शन सावंत, विनोद जाधव, प्रथमेश जाधव यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ग्रामपंचायत सदस्य सुहास गुरव, माजी सरपंच शंकर गुरव, सदानंद बाणे, पांडुरंग बाणे, सत्यवान धुरी, निलेश ठाकूर, मिलिंद करंबेळकर, सुहास खानोलकर, ग्रामसेवक राकेश गोवळकर, मुख्याध्यापिका वृषाली मसुरकर, श्री. कदम, विजय मसुरकर, श्रीमती पांचाळ, निधी पुजारे, प्रकाश गुरव यांच्यासह ग्रामस्थांनीही सहभाग घेतला.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा कमी खर्चाचा प्रभावी उपाय
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, मागील ३५ ते ४० वर्षांच्या कालावधीत यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात नीचांकी पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, राज्य शासनाने जिल्ह्यात दुष्काळाचा ट्रिगर वन लागू केला आहे.
या परिस्थितीत वाहून जाणारे पाणी बंधाऱ्यांद्वारे अडवून त्याच ठिकाणी जिरवणे, तसेच विहिरी आणि तलावांची पाणीपातळी वाढवणे हा पुढील ७ ते ८ महिन्यांसाठी पाणी टिकवून ठेवण्याचा सोपा आणि कमी खर्चाचा उपाय आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लोकसहभागातून १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यानुसार काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आशिये येथे ग्रामपंचायत आणि कणकवली तालुका पत्रकार संघाने लोकसहभागातून उभारलेल्या वनराई बंधाऱ्याचे कौतुक करत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या ‘जलतारा’ कामाचीही पाहणी केली.
पत्रकारांचीही सामाजिक बांधिलकी
कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हा ट्रिगर-१ मध्ये आहे. पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि प्रशासनाने वनराई बंधारे उभारण्याचे आवाहन केले आहे. समाजातील एक प्रमुख घटक म्हणून पत्रकारांचीही जलसंधारणाची जबाबदारी आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारांच्या वतीने पहिला वनराई बंधारा कणकवली-आशिये येथे उभारण्यात आला आहे. विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेऊन जलसंधारणाच्या कामात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शालेय विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत केले श्रमदान
दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड मिळत आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता ते स्थानिक पातळीवर अडवून जिरवणे, भूजलपातळी वाढवणे आणि उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवणे, या उद्देशाने वनराई बंधारे उभारले जात आहेत.
आशिये गावातील शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने जलसंधारणाचे महत्त्व त्यांच्या कृतीतूनच त्यांच्या मनावर बिंबवले गेले. श्रमदानातून विद्यार्थ्यांना श्रमाची प्रतिष्ठा, पाणी बचत, जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यांचे महत्त्व अनुभवातून समजले. केवळ जलसंधारणाची माहिती देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष श्रमदानात सहभागी करून घेणे हा जलसाक्षरता निर्माण करण्याचा प्रभावी मार्ग ठरत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.











