ग्रामीण रुग्णालयात मोफत लसीकरण; घरेलू व गरजू कामगारांचा सहभाग
मालवण (प्रतिनिधी) : घरेलू तसेच गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे मोफत धनुर्वात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कामगार वर्गातील अनेक जण दैनंदिन कामाच्या धावपळीत आपल्या आरोग्याकडे तसेच प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष करतात. कामाच्या ठिकाणी किरकोळ दुखापत होण्याची शक्यता लक्षात घेता धनुर्वातापासून संरक्षणासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरते. ही बाब लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ मालवणने सामाजिक बांधिलकी जपत या मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन केले.
शिबिरात घरेलू कामगारांसह विविध क्षेत्रांतील गरजू कामगारांनी सहभागी होत धनुर्वात प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला. या माध्यमातून कामगारांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
शिबिराच्या आयोजनासाठी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी यांच्यासह जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, महेश अंधारी, गणेश प्रभुलकर आणि उमेश शिरोडकर यांनी सहभाग घेतला. ग्रामीण रुग्णालय, मालवण येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही शिबिरासाठी सहकार्य लाभले.
लायन्स क्लब ऑफ मालवणच्या माध्यमातून सातत्याने विविध जनहिताचे उपक्रम राबविले जातात. सामाजिकदृष्ट्या गरजू घटकांना आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच प्रतिबंधात्मक आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.










