मालवण, दि. ६ (प्रतिनिधी) : मालवण बंदर जेटीनजीकच्या पार्किंग क्षेत्रात गेट बसवून बंद करण्यात आलेले पारंपरिक मार्ग तातडीने खुले करावेत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण मच्छिमार सहकारी संस्था मर्यादितच्या शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत शिष्टमंडळाने स्थानिक नागरिकांसह बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मालवण बंदर जेटी परिसरातील पार्किंग क्षेत्रात हॉटेल सागर किनाराच्या बाजूला तसेच भाजी मार्केटच्या बाजूला गेट बसवून पूर्वीचा ये-जा करण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. या मार्गाचा पूर्वी मच्छिमार व्यावसायिकांकडून मच्छी, मासेमारीचे साहित्य, हातगाडी तसेच दुचाकी नेण्यासाठी नियमित वापर केला जात होता. मात्र, मार्ग बंद केल्यामुळे विशेषतः छोट्या मच्छिमार व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मच्छिमार, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सागर किनारा हॉटेलच्या बाजूचे गेट चार फूट तसेच भाजी मार्केटच्या बाजूचे गेट चार फूट खुले ठेवावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
तसेच सीमा शुल्क विभागाच्या कार्यालयापासून जिल्हा परिषद विश्रामगृहादरम्यान असलेला मार्ग हा स्थानिक मच्छिमार सभासदांचा वंशपरंपरागत वापरातील रस्ता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे हा मार्ग रहदारीसाठी पूर्णपणे मोकळा करून पूर्ववत खुला करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
या मार्गांमुळे मच्छिमारांच्या दैनंदिन व्यवसायावर परिणाम होत असून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनाही ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा. भविष्यात या प्रश्नावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने मच्छिमार, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शिष्टमंडळात मालवण मच्छिमार सहकारी संस्थेचे विकी चोपडेकर, दीपक तांडेल, जॉमी ब्रिटो, संतोष शिरगावकर, जॉन्सन ब्रिटन, सिद्धेश मलिये, अनमोल आढाव, सुशांत कोचरेकर, करण कुबल, कासम बांगी, मोसिन शेख, समद मुकादम, फारुख मुकादम, दरवेश आचरेकर, गौरव जोशी, अनिकेत जोशी, अजिंक्य गिरी, किशोर खानोलकर, परेश धुरी, प्रदीप मालवणकर, अवधूत परुळेकर, महेश कुर्ले, अमेय बादेकर आदी उपस्थित होते.











