आडवण येथे वनराई बंधारा उभारला; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शंभर बंधाऱ्यांचा संकल्प
मालवण (प्रतिनिधी)
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात शंभर वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा शुभारंभ मालवण शहरातील आडवण येथे जलस्रोतावर मातीचा बंधारा उभारून करण्यात आला.
उबाठा शिवसेनेच्या वतीने आडवण परिसरातील जलस्रोतावर जेसीबीच्या साहाय्याने मातीचा बंधारा घालण्यात आला. या बंधाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह अडवून जलसाठा निर्माण होण्यास तसेच परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, उबाठा शिवसेनेच्या महिला उपतालुकाप्रमुख रूपा कुडाळकर, मालवण शहरप्रमुख राधिका मोंडकर, मनोज मोंडकर, गणेश चव्हाण, दत्ता पोईपकर तसेच स्थानिक नागरिक उत्तम चव्हाण, शशिकांत यादव, सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बंधाऱ्यांची उभारणी
यावेळी माजी नगरसेविका पूजा करलकर म्हणाल्या की, शासनाने दुष्काळ जाहीर केला असून संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे हाती घेणे आवश्यक आहे. याच उद्देशाने माजी आमदार वैभव नाईक यांनी शंभर वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केला असून, त्याचा शुभारंभ आडवण येथून करण्यात आला आहे.
मालवण नगरपालिका सध्या विविध कामांमध्ये व्यस्त असल्याने माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून हा बंधारा उभारण्यात आला. या कामासाठी उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभल्याचेही करलकर यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याचे संवर्धन आणि पावसाचे पाणी अडवून ते स्थानिक पातळीवर जिरविण्यासाठी अशा प्रकारचे बंधारे उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या संकल्पानुसार आगामी काळात मालवण परिसरात आणखी वनराई बंधारे उभारण्याच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.










