मुंबई : प्रतिनिधी
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची PAT-1 (पायाभूत मूल्यमापन चाचणी) परीक्षा नोव्हेंबरऐवजी ऑक्टोबरअखेरच घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने शिक्षण विभागाकडे केली आहे. दिवाळीच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर लगेच परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांवर अनावश्यक मानसिक दबाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्याच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांची तीन विषयांची PAT-1 चाचणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. तर उर्वरित विषयांची प्रथम सत्र परीक्षा ऑक्टोबरअखेर घेण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळीची प्रदीर्घ सुट्टी मिळणार आहे.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर लगेच अभ्यास आणि परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवर येण्याची शक्यता शिक्षक संघटनेने व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण तणावमुक्त आणि आनंददायी वातावरणात व्हावे, यासाठी PAT-1 परीक्षा ऑक्टोबरअखेरच घेण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. परीक्षा नियोजनाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.











