‘शिवसृष्टी थ्रू माय लेन्स’ संकल्पनेतून शिवचरित्राची मांडणी; १ लाख ४० हजारांचे पारितोषिक
मालवण (प्रतिनिधी)
आंबेगाव, पुणे येथील शिवसृष्टी थीम पार्कतर्फे आयोजित राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेत मालवण येथील सिद्धेश अर्जुन चव्हाण याने प्रथम क्रमांक पटकावला. ‘शिवसृष्टी व शिवचरित्र’ या विषयावर आधारित या स्पर्धेत राज्यभरातील रिल्स क्रिएटर आणि सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर्सनी सहभाग घेतला होता.
शिवसृष्टी थीम पार्कतर्फे मोठ्या बक्षिसांची घोषणा करत या राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सिद्धेश चव्हाण याने ‘शिवसृष्टी थ्रू माय लेन्स’ या संकल्पनेतून आंबेगाव येथील शिवसृष्टी तसेच शिवकाळातील विविध प्रसंग आपल्या कल्पक रिल्सच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले.
सिद्धेशने सादर केलेली रिल्स परीक्षकांच्या पसंतीस उतरली आणि त्याला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. आंबेगाव येथील शिवसृष्टी थीम पार्कमध्ये आयोजित बक्षीस वितरण समारंभात राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते सिद्धेश चव्हाण याचा गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांकासाठी त्याला १ लाख ४० हजार रुपयांचे भेटवस्तूरूपी पारितोषिक प्रदान करण्यात आले.
मालवणच्या सिद्धेश चव्हाण याने आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून शिवचरित्र आणि शिवसृष्टीची प्रभावी मांडणी करत राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.












