मालवण (प्रतिनिधी) — ‘चला शाळेत जाऊया अभियान’ अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने ओरोस येथे आयोजित आढावा बैठकीत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी साकारलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेतली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रांगोळीचे कौतुक करत चांदरकर यांचा सन्मान केला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ‘चला शाळेत जाऊया अभियान’ संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाची आढावा बैठक सिंधुनिती नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीनिमित्त समीर चांदरकर यांना ‘चला शाळेला जाऊया अभियान’ या विषयावर रांगोळी साकारण्याची संधी मिळाली. त्यांनी सुमारे दोन तासांत ४ फूट × ८ फूट आकाराची आकर्षक रांगोळी साकारली. रांगोळी पाहून मंत्री दादा भुसे यांनी चांदरकर यांच्या कलाकौशल्याचे कौतुक केले. तसेच भगवद्गीता भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
या वेळी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, प्रितेश राऊळ, बांधकाम समिती अध्यक्ष संतोष साटविलकर, सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही समीर चांदरकर यांच्या रांगोळीचे कौतुक केले.











