मालवण (प्रतिनिधी) — महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाच्या कथित गैरकारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार २८ सप्टेंबरपासून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. त्याच आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत त्रुटी व चुका करून मतचोरी करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे सहकार्य केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
जनतेच्या मतांचा अनादर करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, प्रशासकीय सेवेत असताना पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे देशभरात ‘लोकशाही वाचवा सत्याग्रह’ सुरू असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्येही उद्या आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व तालुक्यांतील प्रांत कार्यालये व तहसील कार्यालयांवर मोर्चा नेऊन निवेदन देण्यात येणार आहे. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिमेला काळे फासून आणि प्रतिमेचे दहन करून निषेध नोंदविण्याचा आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.











