सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आरोग्यसेवेला बळकटी देणारा आणि स्थानिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी संधी निर्माण करणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सिंधुदुर्गमध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्यातील नर्सिंग शिक्षणाच्या विस्तारासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचा थेट लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार आहे.
राज्यात प्रशिक्षित परिचारिकांची वाढती गरज लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाने नर्सिंग शिक्षणाच्या सुविधा आणि प्रवेश क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्गसह चंद्रपूर, यवतमाळ, अलिबाग, रत्नागिरी, अमरावती, धाराशिव आणि गडचिरोली येथे प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
या निर्णयासाठी एकूण ५५८.७१ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाचा निधी वगळता ४९१.९१ कोटी रुपये राज्याच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध करून देण्यात येणार असून, चार वर्षांच्या कालावधीत हा खर्च टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गसारख्या कोकणातील जिल्ह्यात शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नर्सिंगचे पदवी शिक्षण घेण्यासाठी मुंबई, पुणे किंवा अन्य मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातच प्रशिक्षित परिचारिकांचे मनुष्यबळ तयार होऊन ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्यसेवाही अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.
राज्यात सध्या २ लाख १७ हजार ६४० परिचारिका नोंदणीकृत आहेत. मात्र शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांमध्ये प्रशिक्षित परिचारिकांची गरज सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नर्सिंग शिक्षणाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सिंधुदुर्गमध्ये १०० जागांचे नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय ही केवळ शिक्षणाची सुविधा नसून जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणारे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.











