‘नाना’ पाटेकर.. भारतीय अभिनयविश्वातलं हे नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर येतो तो दमदार आवाज, धारदार संवाद आणि व्यक्तिरेखेत जीव ओतणारा अभिनेता…
वयाच्या ७५व्या वर्षी नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाले आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील एका असामान्य अभिनयप्रवासाचा पडदा पडला. रंगभूमीपासून सुरू झालेला हा प्रवास ‘गमन’मधील वासूपासून ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकरांपर्यंत आणि ‘वेलकम’मधील उदय शेट्टीपासून ‘द व्हॅक्सिन वॉर’मधील डॉ. बलराम भार्गवांपर्यंत पोहोचला. प्रत्येक टप्प्यावर नाना बदलले, पण त्यांच्या अभिनयातील अस्सलपणा कधी बदलला नाही.
‘गमन’पासून सुरू झालेला प्रवास
१९७८ मध्ये ‘गमन’मधील वासू या भूमिकेतून नानांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर मराठीतील ‘सिंहासन’मध्ये स्मगलर, ‘भालू’मध्ये रंगराव, रघु मैना’मध्ये रघु आणि ‘सावित्री’मध्ये बाबन अशा भूमिका त्यांनी केल्या.
‘आज की आवाज’मधील जगमोहनदास, ‘गिद्ध’मधील वीरप्पन, ‘गड जेेजुरी जेेजुरी’मधील खंडू, ‘अंकुश’मधील रविंद्र केळकर ‘रवी’, ‘माफीचा साक्षीदार’मधील राघवेंद्र आणि ‘फाँसी का फंदा’मधील राघवेंद्र या भूमिका त्यांच्या सुरुवातीच्या काळातील वैविध्य दाखवतात.
१९८७ मध्ये ‘शीला’, ‘सूत्रधार’मधील कुमार, ‘मोहरे’मधील अब्दुल, ‘अंधा युद्ध’मधील एस. पी. सुहास दांडेकर, ‘प्रतिघात’मधील माजी कॉन्स्टेबल करमवीर आणि ‘अवाम’मधील कर्नल मुस्तफा अली जाहिदी अशा व्यक्तिरेखांतून त्यांची अभिनयाची व्याप्ती वाढत गेली.
‘त्रिशाग्नी’मधील उचांडा, ‘सागर संगम’मधील रामनाथ शास्त्री/रामू उस्ताद आणि ‘सलाम बॉम्बे!’मधील बाबा यांनी त्यांना गंभीर आणि वास्तववादी अभिनेता म्हणून अधिक ठामपणे स्थापित केले.
‘परिंदा’चा अण्णा आणि अभिनयाला मिळालेली राष्ट्रीय दखल
१९८९च्या ‘परिंदा’मधील अण्णा सेठ ही भूमिका नानांच्या कारकिर्दीतील निर्णायक वळण ठरली. गुन्हेगारी जगतातील निर्दयी व्यक्तिमत्त्व त्यांनी इतक्या प्रभावीपणे उभे केले की त्यांच्या अभिनयाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
त्यानंतर ‘थोडासा रुमानी हो जाएँ’मधील नटवरलाल आणि ‘दिशा’मधील वसंत डी. मांद्रे या भूमिका आल्या.
मग आला ‘प्रहार : द फायनल अटॅक’.
मेजर चौहान ही भूमिका साकारताना नाना केवळ अभिनेते नव्हते; ते या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि पटकथालेखकही होते. त्यानंतर दीक्षा’मधील कोगा पंडित, ‘राजू बन गया जेन्टलमन’मधील जय आणि ‘अंगार’मधील माजिद खान या भूमिकांनी त्यांच्या अभिनयाला आणखी वेगळी परिमाणे दिली. ‘अंगार’मधील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार मिळाला.
‘क्रांतिवीर’चा प्रताप आणि ‘अग्निसाक्षी’चा विश्वनाथ
‘तिरंगा’मधील शिवाजीराव वागळे ही भूमिका देशभक्ती आणि आक्रमकतेचा संगम होती. त्यानंतर ‘क्रांतिवीर’मधील प्रताप नारायण तिलक ही भूमिका आली आणि नानांच्या अभिनयाला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मान्यता मिळाली.
प्रतापच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि स्क्रीन पुरस्कार मिळाले. त्यानंतर ‘अभय’मधील भूत आणि ‘हम दोनों’मधील विशाल सैगल अशा भूमिका त्यांनी साकारल्या.
१९९६ मधील ‘अग्निसाक्षी’मधील विश्वनाथ या भूमिकेने त्यांच्या अभिनयातील भय, विकृती आणि मानसिक गुंतागुंत प्रभावीपणे दाखवली. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
त्याच वर्षी ‘खामोशी : द म्युझिकल’मधील जोसेफ ब्रॅगांझा ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली. त्यानंतर ‘गुलाम-ए-मुस्तफा’मधील गुलाम-ए-मुस्तफा, ‘यशवंत’मधील यशवंत लोहार, ‘युगपुरुष’मधील अनिरुद्ध, ‘वजूद’मधील मल्हार गोपाळदास अग्निहोत्री/कर्नल लट्टी, ‘हू तू तू’मधील भाऊ आणि ‘कोहराम’मधील मेजर अजित आर्या अशा भूमिका आल्या.
पोलिस, डॉक्टर, गुन्हेगार… प्रत्येक चेहरा आपला
२००० मध्ये ‘गँग’मधील अब्दुल आणि ‘तर्कीब’मधील सीबीआय इन्स्पेक्टर जसऱाज पटेल त्यांनी साकारले.
‘वध’मधील डॉ. अर्जुन सिंह, ‘शक्ती : द पॉवर’मधील नरसिंहा, ‘भूत’मधील इन्स्पेक्टर लियाकत कुरेशी, ‘डरना मना है’मधील जॉन रॉड्रिग्ज आणि ‘आँच’मधील महादेव या भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील वैविध्य अधोरेखित करतात.
मात्र २००४ मध्ये आलेल्या ‘अब तक छप्पन’मधील इन्स्पेक्टर साधू आगाशेने नानांच्या पोलिस भूमिकेला नवी ओळख दिली. शांत, कठोर, भावनांवर नियंत्रण ठेवणारा आणि गुन्हेगारांविरुद्ध स्वतःच्या पद्धतीने लढणारा साधू आगाशे प्रेक्षकांच्या स्मरणात कायम राहिला.
त्यानंतर ‘अपहरण’मधील तबरेज आलम, ‘पक पक पकाक’मधील भुत्या आणि ‘ब्लफमास्टर!’मधील चंद्रू पारेख या भूमिका त्यांनी केल्या.
‘फिर हेरा फेरी’साठी त्यांनी निवेदनाचा आवाज दिला, तर ‘टॅक्सी नं. ९२११’मधील राघव शास्त्री ही भूमिका साकारली.
अण्णापासून उदय शेट्टीपर्यंत
२००७ मध्ये नानांच्या अभिनयातील एक वेगळीच बाजू समोर आली.
‘वेलकम’मधील डॉन उदय शेट्टी.
गंभीर, हिंसक आणि आक्रमक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नानांनी याच प्रतिमेला विनोदात बदलले. उदय शेट्टी आणि मजनू भाईच्या जोडीतील विनोदाने प्रेक्षकांना अक्षरशः खळखळून हसवले. ‘वेलकम’नंतर हीच भूमिका त्यांनी **‘वेलकम बॅक’**मध्ये पुन्हा साकारली.
याच काळात ‘हॅट्रिक’मधील डॉक्टर, ‘दस कहानियाँ’मधील ‘गुब्बारे’ भागातील फुगे घेऊन जाणारा माणूस, ‘यात्रा’मधील दशरथ जोगळेकर, ‘द पूल’मधील बंगला मालक आणि ‘एक : द पॉवर ऑफ वन’मधील सीबीआय अधिकारी राणे अशा भूमिका त्यांनी केल्या.
तमिळ चित्रपटसृष्टीत ‘बॉम्मलाट्टम’मधील राणा ही भूमिका करत त्यांनी प्रादेशिक सीमा ओलांडल्या.
२०१० मध्ये ‘पाठशाला’मधील प्राचार्य आदित्य सहाय, ‘राजनीती’मधील बृज गोपाल, ‘तुम मिलो तो सही’मधील सुब्रमणियम आणि कन्नड चित्रपटातील ‘यक्ष’मधील पोलीस अधिकारी अशा भूमिका त्यांनी केल्या.
‘राजनीती’मधील बृज गोपाल ही व्यक्तिरेखा भारतीय राजकारणातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर उभी होती. त्यानंतर ‘शागिर्द’मधील हनुमंत सिंह, मराठीतील ‘देऊळ’मधील भाऊ गलांडे आणि ‘कमाल धमाल मालामाल’मधील कल्लू या भूमिका आल्या.
२०१३ मधील द अटॅक्स ऑफ २६/११’मध्ये त्यांनी पोलीस अधिकारी राकेश मारिया यांची भूमिका केली.
२०१४ मध्ये मात्र त्यांनी एका खऱ्या व्यक्तिमत्त्वाला पडद्यावर आणले,‘डॉ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो’मधील डॉ. प्रकाश आमटे.
या भूमिकेत अभिनयापेक्षा माणूस समजून घेण्याची गरज अधिक होती. त्यानंतर ‘यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची’मधील प्रताप देशमुख ही भूमिका आली.
२०१५ मध्ये ‘अब तक छप्पन २’मध्ये साधू आगाशे पुन्हा भेटला आणि ‘वेलकम बॅक’मध्ये उदय शेट्टी पुन्हा प्रेक्षकांसमोर आला.
‘नटसम्राट’ : अभिनयाचा सर्वोच्च कळस
२०१६.
‘नटसम्राट’.
आणि गणपतराव रामचंद्र बेलवलकर.
कुसुमाग्रजांच्या अजरामर व्यक्तिरेखेला नानांनी पडद्यावर केवळ साकारले नाही; त्यांनी त्या नटाचे संपूर्ण आयुष्य आपल्या आवाजात, देहबोलीत आणि डोळ्यांत उतरवले.
आयुष्यभर रंगभूमीवर टाळ्या मिळवलेला कलाकार वृद्धापकाळात आपल्या कुटुंबापासून दुरावतो, तेव्हा त्याच्या मनात निर्माण होणारी पोकळी नानांनी इतक्या अस्सलपणे साकारली की गणपतराव आणि नाना यांच्यातील सीमाच मिटून गेली.
या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर मराठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
त्याच वर्षी ‘द जंगल बुक’च्या हिंदी आवृत्तीत त्यांनी शेर खानला आवाज दिला आणि ‘फायनल कट ऑफ डायरेक्टर’मधील राणा ही भूमिका केली.
त्यानंतर ‘वेडिंग अॅनिव्हर्सरी’मधील नागार्जुन, ‘गोलमाल अगेन’मध्ये स्वतःची विशेष भूमिका, ‘आपला माणूस’मधील मारुती नागरगोजे/अब्बा गोकळे आणि तमिळ ‘काला’मधील हरिदेव अभयंकर अर्थात हरी दादा अशा व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या.
२०२० मध्ये ‘इट्स माय लाइफ’मधील व्यावसायिक, २०२२ मध्ये ‘तडका’मधील तुकाराम दळवी, २०२३ मध्ये ‘गदर २’साठी निवेदकाचा आवाज आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’मधील डॉ. बलराम भार्गव या भूमिका त्यांनी केल्या.
२०२४ मध्ये मराठी ‘ओले आले’मधील ओंकार लेले आणि हिंदी ‘वनवास’मधील प्रताप सिंघानिया हे त्यांचे पडद्यावरील अलीकडचे चेहरे ठरले.
२०२५ मध्ये ‘हाऊसफुल ५’मधील धगडू हुलगुंड, तर २०२६ मध्ये ‘ओ’रोमिओ’मधील इस्माईल खान आणि ‘सुबेदार’मधील नाना वाघमारे ही विशेष भूमिका त्यांच्या फिल्मोग्राफीमध्ये नोंदली गेली आहे.
नानांचा अभिनय केवळ चित्रपटांपुरता मर्यादित नव्हता. दूरदर्शनवरील ‘अपराधी कौन’, ‘शोध’, ब्रिटिश मालिका ‘Lord Mountbatten: The Last Viceroy’मधील नथुराम गोडसे, मराठीतील ‘मन वढाय वढाय’, ‘Naammatra’ आणि २०२६ मधील ‘Sankalp’मधील कन्हैयालाल अशा भूमिका त्यांच्या दूरदर्शन कारकिर्दीत आहेत.
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता अशा अनेक भूमिका त्यांनी आयुष्यात निभावल्या. ‘प्रहार’ हा त्यांचा दिग्दर्शक आणि पटकथालेखक म्हणूनही महत्त्वाचा टप्पा ठरला.
पण या सगळ्या भूमिका मोजूनही नाना पाटेकरांचे मूल्यमापन पूर्ण होत नाही.
कारण अण्णा सेठ, प्रताप नारायण तिलक, साधू आगाशे, उदय शेट्टी, बृज गोपाल, डॉ. प्रकाश आमटे आणि गणपतराव बेलवलकर हे वेगवेगळे चेहरे होते; मात्र त्या प्रत्येक चेहऱ्यामागे एकच कलाकार होता
भूमिकेच्या आत शिरून तिला माणूस बनवणारा नाना.
नानांच्या जाण्याने सर्वसामान्य माणसाला रुपेरी पडद्यावर पाहणारा स्वताचा चेहरा आज हरवलाय हे मात्र नक्की..











