मालवण (प्रतिनिधी) :
विकासाच्या नावाखाली आपणच आजपर्यंत मोठ्या प्रमाणात वनांचा ऱ्हास केला. त्याचे परिणाम आता दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या रूपाने आपल्यासमोर उभे राहिले आहेत. त्यामुळे वनांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मालवणचे वनरक्षक अतुल खोत यांनी केले.
कट्टा येथील वराडकर हायस्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त वनविभाग सावंतवाडी आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन व जलसंवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हेरंब दशावतारी नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या कलाकारांनी वनसंरक्षण आणि पाणीसंवर्धनाचा संदेश देणारे दशावतारी नाटक विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, सचिव सुनील नाईक, वनपाल सदानंद परब, सामाजिक वनीकरण विभाग कट्टा येथील वनपाल पिळणकर, वनपाल वसावे, सहाय्यक शिक्षक समीर चांदरकर, भूषण गावडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर शिक्षक समीर चांदरकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी मार्गदर्शन करताना अतुल खोत म्हणाले की, वने टिकली तरच आपले जीवन समृद्ध राहणार आहे. वनांचे अस्तित्व केवळ पर्यावरणासाठी नव्हे, तर पाणी, शेती आणि मानवी जीवनासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाने निसर्ग संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे. वनांचे संरक्षण ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी ही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
दशावतारी नाटकातून वनतोड, पाणीटंचाई आणि निसर्ग संवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.












