देऊळवाडा-आडवण ते रेवतळे मार्गावरील नदीप्रवाह सुरळीत करण्याची मागणी; नदीकाठाचे सुशोभीकरण व संरक्षणात्मक बांधकामाचीही मागणी
मालवण (प्रतिनिधी) : देऊळवाडा-आडवण ते रेवतळे मार्गावरील कोळंब नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला गाळ तातडीने उपसा करून नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मालवण उपशहरप्रमुख किरण चव्हाण व युवासेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
कोळंब नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम झाला आहे. परिणामी नदीपात्रातील पाण्याची नैसर्गिक देवाणघेवाणही बाधित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पूर्वी नदीपात्रात साचणाऱ्या गोड्या पाण्यामुळे परिसरातील विहिरींना पाण्याचे झरे मिळत होते. मात्र, गाळ साचल्यामुळे ही परिस्थिती बदलत असून आडारी खाडीच्या खाऱ्या पाण्याचा परिणाम नदीकाठच्या विहिरींवर होत असल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रश्न गंभीर
परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता नदीपात्रातील गाळ उपसा करणे आवश्यक असल्याचे किरण चव्हाण यांनी म्हटले आहे. नदीपात्रातील गाळ काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत केल्यास नदीकाठच्या विहिरींमध्ये गोड्या पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठीही या कामाचा उपयोग होण्याची शक्यता आहे.
सध्या परिसरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना कोळंब नदीपात्रातील गाळ उपशाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे. त्यामुळे हे काम संबंधित विकास आराखड्यात तातडीने समाविष्ट करून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी आणि प्रत्यक्ष गाळ उपशाचे काम विलंब न करता सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नदीकाठाच्या संरक्षणाचीही मागणी
गाळ उपशासोबतच नदीकाठाचे सुशोभीकरण करावे तसेच आवश्यक ठिकाणी संरक्षणात्मक बांधकामे करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. नदीपात्राची स्वच्छता, पाण्याचा सुरळीत प्रवाह आणि नदीकाठाचे संरक्षण याकडे एकत्रितपणे लक्ष दिल्यास परिसरातील नागरिकांना त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली आहे.












