खरारे-पेंडूर येथे बंधाऱ्यांचे काम; विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामपंचायतीचा सहभाग
मालवण (प्रतिनिधी) : समाजहिताचे कोणतेही कार्य असेल, तर ते पुढे नेण्याचा संकल्प कै. संजय नाईक यांचा होता. शिक्षण, आरोग्य किंवा शेती अशा विविध क्षेत्रांत समाजोपयोगी उपक्रम राबवून सर्वांना सोबत घेऊन काम करणे, हेच त्यांचे ब्रीद होते. त्यांचे हे विचार पुढे नेत कै. संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान आणि वराडकर ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
खरारे-पेंडूर येथे गावात भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, तसेच पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरावे, या उद्देशाने बंधारे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. या उपक्रमात शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामपंचायत खरारे-पेंडूरचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
यावेळी संदेश उर्फ पप्या नाईक, प्रदीप सावंत पटेल, पप्या राणे, प्रशांत राणे, संजय पेंडूरकर सर, शेखर फोंडेकर, अमित सावंत, भाऊ घाडी, संतोष घाडी, भार्गव सावंत तसेच ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका आणि कर्मचारी उपस्थित होते.
समाजाच्या गरजा ओळखून त्यावर सामूहिक सहभागातून उपाययोजना करणे, हीच कै. संजय नाईक यांच्या विचारांची खरी वाटचाल असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.











