बंदर जेटी वाहनतळावर स्थानिक लोककला पथकांचे सादरीकरण; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य
मालवण (प्रतिनिधी) : कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचा अनुभव घेण्याची संधी मालवणकरांसह पर्यटकांना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने शनिवार, १० आणि रविवार, ११ ऑक्टोबर रोजी मालवण बंदर जेटी वाहनतळ येथे ‘बीच लोककला महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही दिवस सायंकाळी ५.३० वाजता महोत्सवाला सुरुवात होणार असून, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवात स्थानिक लोककला पथके सहभागी होणार आहेत. त्यांच्या सादरीकरणातून कोकणातील पारंपरिक कलाप्रकार, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाची झलक अनुभवता येणार आहे. समुद्रकिनाऱ्याच्या सान्निध्यात रंगणारा हा महोत्सव स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच लोककलांच्या जतन आणि संवर्धनासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित या महोत्सवाचा नागरिकांनी आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.












