सलग दोन दिवस नियोजित बैठका रद्द; वैभव नाईक यांचा तहसीलदारांना टोला
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठका सलग दोन दिवस रद्द झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आमदार निलेश राणे यांनी ऐनवेळी उपस्थित राहता येणार नसल्याचे कळविल्याने ८ आणि ९ ऑक्टोबर रोजीच्या बैठका रद्द कराव्या लागल्याचा दावा करत माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. “मालवणच्या पाणीटंचाईच्या बैठकीला आमदारांना सिंधुदुर्गात येणे शक्य नसेल, तर ही बैठक आता त्यांच्या मुंबईतील बंगल्यावर घ्या, म्हणजे जिल्ह्यात येण्याचा त्यांचा त्रास कमी होईल,” असा उपरोधिक टोला नाईक यांनी तहसीलदारांना लगावला.
दोन दिवस बैठका रद्द झाल्याचा दावा
मालवण तालुक्यातील पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यासाठी तहसीलदारांनी आमदार निलेश राणे यांची वेळ घेऊन ८ ऑक्टोबर रोजी आढावा बैठक निश्चित केली होती. या बैठकीसाठी संबंधित अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांना लेखी पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी आमदारांना उपस्थित राहता येणार नसल्याचे कळविण्यात आल्याने पहिली बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी तहसीलदारांनी पुन्हा पत्रव्यवहार करून संबंधितांना कळविले होते.
मात्र, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता आमदारांना बैठकीस उपस्थित राहता येणार नसल्याचे कळविण्यात आल्याने दुसऱ्या दिवशीची बैठकही रद्द करण्यात आली. बैठकीच्या रद्द होण्याची सूचना संबंधितांना व्हॉट्सॲप संदेशाद्वारे देण्यात आली. सलग दोन दिवस बैठका रद्द झाल्याने अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांचा वेळ वाया गेल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
‘पाणीटंचाईच्या नियोजनाला गांभीर्य हवे’
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दुष्काळप्रभावित क्षेत्राच्या यादीत समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे नाईक यांनी सांगितले.
मालवण तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेळेत कृती आराखडा तयार करणे, त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून घेणे आणि नवीन जलस्रोत निर्माण करणे गरजेचे आहे. ही जबाबदारी लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पार पाडली पाहिजे. अन्यथा आगामी काळात मालवणकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला.
पाणीटंचाईसारख्या जनहिताच्या महत्त्वाच्या प्रश्नावर आयोजित बैठका सलग दोन दिवस रद्द झाल्याने आता या विषयावर पुढील बैठक कधी होणार आणि पाणीटंचाईच्या उपाययोजनांना प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार, याकडे मालवण तालुक्याचे लक्ष लागले आहे.











