‘सलग तीन ऑलिम्पिक’ची अट शिथिल करा; रौप्य, कांस्यपदक विजेत्यांनाही संधी देण्याची मागणी
मालवण (प्रतिनिधी) : गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याऐवजी क्रीडा आरक्षणाच्या नव्या नियमांमुळे त्यांच्या संधी मर्यादित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ५ टक्के क्रीडा आरक्षणासंदर्भातील नव्या शासन निर्णयातील काही अटींवर आक्षेप घेत सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. क्रीडा आरक्षणाचे निकष अधिक समावेशक करावेत आणि क्रीडा क्षेत्रातील संघटना, खेळाडू व तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णयात आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी महासंघाने केली आहे.
महासंघाच्या मते, एखादा खेळ सलग तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असणे ही अट अव्यवहार्य आहे. त्यामुळे भविष्यात ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होणाऱ्या नवीन खेळांतील गुणवंत खेळाडूंना आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. तसेच हिवाळी ऑलिम्पिकमधील खेळांचाही (Winter Olympic Sports) स्पष्टपणे समावेश करण्याची मागणी महासंघाने केली आहे.
राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये केवळ सुवर्णपदक विजेत्यांनाच आरक्षणाचा लाभ देण्याच्या तरतुदीवरही महासंघाने नाराजी व्यक्त केली आहे. राज्यस्तरावर रौप्य आणि कांस्यपदके मिळवणारे खेळाडूही गुणवंत असून, त्यांना आरक्षणाच्या संधीपासून दूर ठेवणे योग्य नसल्याचे महासंघाने म्हटले आहे. पदकाच्या क्रमवारीपेक्षा खेळाडूंची गुणवत्ता आणि कामगिरी विचारात घेणारे निकष असावेत, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
गट-ब मधील राजपत्रित आणि अराजपत्रित पदांसाठी वेगवेगळे निकष निश्चित केल्याने समान क्रीडा गुणवत्ता असलेल्या खेळाडूंमध्ये भेदभाव होण्याची शक्यता असल्याचेही महासंघाने निदर्शनास आणले आहे.
१४ ते १७ वयोगटातील खेळाडूंच्या भवितव्याचा प्रश्न
शालेय स्तरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १४ ते १७ वयोगटातील खेळाडूंच्या भवितव्याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे. या वयात क्रीडा क्षेत्रात यश मिळवणाऱ्या खेळाडूंना भविष्यात शासकीय नोकरीतील आरक्षणाची संधी मिळण्यासाठी धोरणात आवश्यक तरतुदी असणे गरजेचे असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.
भारताने २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनाचे ध्येय समोर ठेवले असताना देशातील खेळाडूंना प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्या कामगिरीला योग्य संधी उपलब्ध करून देणारे धोरण आवश्यक आहे. अशा वेळी क्रीडा क्षेत्रात पुढे येणाऱ्या युवा खेळाडूंसाठी संधी वाढविण्याऐवजी पात्रतेच्या अटी अधिक कठीण करणे योग्य नसल्याचे महासंघाने स्पष्ट केले.
धोरणात सुधारणा करण्याची मागणी
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, मान्यताप्राप्त राज्य क्रीडा संघटना, खेळाडू आणि क्रीडा तज्ज्ञांशी चर्चा करून सुधारित धोरण निश्चित करावे, अशी मागणी महासंघाने केली आहे. ‘सलग तीन ऑलिम्पिक’ ही अट शिथिल करणे, नव्याने ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट होणाऱ्या खेळांसह हिवाळी ऑलिम्पिकमधील खेळांचा विचार करणे, राज्यस्तरीय रौप्य व कांस्यपदक विजेत्यांनाही पात्रतेची संधी देणे आणि १४ ते १७ वयोगटातील गुणवंत खेळाडूंच्या भविष्यातील संधी सुरक्षित करणे, या प्रमुख मागण्यांचा त्यात समावेश आहे.
“खेळाडूंना आरक्षणाच्या मार्गात अडथळे निर्माण करू नका; त्यांना पुढे जाण्याची संधी द्या. गुणवंत खेळाडूंच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्या तरतुदी तातडीने बदलल्या पाहिजेत,” अशी ठाम भूमिका महासंघाचे अध्यक्ष अजय शिंदे, कार्याध्यक्ष विजय मागाडे आणि सचिव नंदकिशोर नाईक यांनी व्यक्त केली.











