२५ खलाशांना सुखरूप वाचवले; जळती नौका धक्क्यावर आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न
मालवण (प्रतिनिधी) : देवगड बंदराजवळील समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या ‘भगवती कृपा’ या मच्छीमार नौकेला सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर नौकेवरील २५ खलाशांना इतर नौकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, आगीत नौकेचे मोठे नुकसान झाले असून, जळती नौका देवगड बंदरातील धक्क्यावर आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
देवगड बंदराजवळील समुद्रात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास IND-MH-4-MM-1614 नोंदणी क्रमांकाच्या ‘भगवती कृपा’ नौकेला अचानक आग लागली. संतोष रमेश पेंडणेकर यांच्या मालकीची ही नौका आगीच्या विळख्यात सापडताच परिसरातील मच्छीमारांनी मदतीसाठी धाव घेतली. तातडीने बचावकार्य राबवत नौकेवरील सर्व २५ खलाशांना इतर नौकांवर सुरक्षितपणे हलविण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
वाऱ्याचा जोर; दोरखंड तुटल्याने बचावकार्यात अडथळे
आग लागलेल्या नौकेला सुरक्षितपणे देवगड बंदराच्या धक्क्यावर आणण्यासाठी इतर नौकांच्या मदतीने प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, समुद्रातील वाऱ्याचा जोर आणि आगीमुळे नौकेच्या हालचाली अनियंत्रित होत असल्याने बचावकार्य कठीण बनले. नौका ओढण्यासाठी वापरण्यात येणारे दोरखंड वारंवार तुटत असल्याने प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण होत होते. आग पूर्णपणे विझली नसल्याने ती पुन्हा भडकण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती.
मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी
नौकेवरील सर्व खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी जळती नौका बंदरात आणण्याचे आव्हान कायम होते. स्थानिक मच्छीमार, अन्य नौकामालक आणि संबंधित यंत्रणांकडून नौका सुरक्षितपणे धक्क्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी आणि पोलीस दाखल झाले असून, आगीचे नेमके कारण शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या भीषण आगीत ‘भगवती कृपा’ नौकेचे किती नुकसान झाले, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीचे कारणही स्पष्ट झालेले नाही. २५ खलाशांचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला असला, तरी या घटनेमुळे देवगडमधील मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.











