संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; थोरला व्हाळ येथे ४५ फूट लांबीचा बंधारा
मालवण (प्रतिनिधी) : अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता लक्षात घेऊन मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ गोवेकरवाडी येथील ग्रामस्थांनी जलसंधारणासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदान करत आनंदव्हाळ येथील थोरला व्हाळ येथे बंधारा उभारला. स्वखर्चातून आणि स्वकष्टातून उभारलेल्या या बंधाऱ्यामुळे पाणी अडविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
गोवेकरवाडीचे पोलीस पाटील दशरथ गोवेकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थ एकत्र आले. त्यांनी आनंदव्हाळ-थोरला व्हाळ येथे ४५ फूट लांब आणि साडेतीन फूट उंचीचा बंधारा उभारला. या कामासाठी ग्रामस्थांनी स्वतःचा खर्च आणि श्रम देत जलसंधारणाचा उपक्रम यशस्वी केला.
उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे महत्त्वाचे आहे. याच विचारातून ग्रामस्थांनी एकत्र येत बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला. लोकसहभागातून राबविलेल्या या उपक्रमामुळे गावातील जलसंधारणाच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे.
या उपक्रमात पोलीस पाटील दशरथ गोवेकर, अनंत नांदोस्कर, पपी गोवेकर, निलेश गोवेकर, संदीप गोवेकर, राकेश गोवेकर, भाऊ गोवेकर, विरेश नांदोस्कर, मंदार गोवेकर, उमेश गोवेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.












