Villagers from Varachi Guramwadi in Sindhudurg have warned of a hunger strike on October 22, demanding water storage in three check dams built at a cost of over ₹60 lakh.
२२ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा निर्णय; लाखो रुपये खर्चूनही बंधाऱ्यांचा उपयोग होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप
मालवण (प्रतिनिधी) : वरची गुरामवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तीन पक्क्या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात यावे, या मागणीसाठी ॲड. गीता काळे आणि कृषिमित्र आनंद रावले यांनी २२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून, वारंवार विनंती करूनही संबंधित यंत्रणांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे.
निवेदनानुसार, वरची गुरामवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तीन पक्के बंधारे बांधण्यात आले आहेत. २०१६ मध्ये वाईरकरवाडी येथे २४ लाख ९३ हजार १३५ रुपये खर्चून बंधारा बांधण्यात आला. त्यानंतर २०१९ मध्ये तेलीवाडी उभाधोडा येथे १७ लाख ८५ हजार ३२१ रुपये खर्चून बंधारा उभारण्यात आला. या दोन्ही बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पेंडूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडे देण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
तसेच, २०२१ मध्ये बाजारपेठ कट्टा येथे १८ लाख १२ हजार ८८ रुपये खर्चून तिसरा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याची जबाबदारी वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांकडे सोपविण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या तीनही बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पेंडूर विकास सोसायटी, वरची गुरामवाडी ग्रामपंचायत आणि लघुपाटबंधारे विभागाकडे विनंती अर्ज करण्यात आले. मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याचा दावा ॲड. गीता काळे यांनी केला आहे. बंधारे बांधल्यापासून त्यामध्ये एकदाही पाणी अडविण्यात आले नसल्याने त्यासाठी खर्च झालेला लाखो रुपयांचा निधी वाया जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पाणी संवर्धनाचे महत्त्व अधिक वाढले आहे. गावातील पक्क्या बंधाऱ्यांमध्ये दरवर्षी नियमितपणे पाणी अडविले असते, तर गावाला पाणीटंचाईची झळ कमी बसली असती, असे कृषिमित्र आनंद रावले यांनी म्हटले आहे.
त्यामुळे किमान यंदा तरी या तीनही बंधाऱ्यांमध्ये प्लेट्स टाकून पाणी अडविण्यात यावे, अशी मागणी ॲड. काळे यांनी ग्रामपंचायत आणि पेंडूर विकास सोसायटीकडे केली आहे. मात्र, अद्याप कार्यवाही झाली नसल्याने २२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे ॲड. गीता काळे आणि आनंद रावले यांनी स्पष्ट केले आहे.











