बॅ. नाथ पै सेवांगण येथे दिवसभर विचारमंथन; जैवविविधता, शाश्वत पर्यटन, मत्स्य दुष्काळ आणि बागायतदारांच्या प्रश्नांवर चर्चा
मालवण (प्रतिनिधी) : साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकणचा शाश्वत विकास’ या विषयावर रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बॅ. नाथ पै सेवांगण येथे हे चर्चासत्र होणार आहे.
कोकणचे निसर्गसौंदर्य आणि नैसर्गिक संसाधने पर्यटकांसह विविध उद्योगांना आकर्षित करतात. मात्र, वाढता पर्यटन ओघ आणि नव्याने येणारे उद्योग कोकणासाठी कितपत फायदेशीर आहेत, तसेच त्यांचे दीर्घकालीन परिणाम काय असतील, यावर सातत्याने चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर कोकणातील जैवविविधता जपत विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणात नेमके कोणते उद्योग आवश्यक आहेत, शाश्वत पर्यटनाची संकल्पना कशी राबवता येईल, मत्स्य दुष्काळावर कोणते उपाय करता येतील, तसेच आंबा आणि काजू बागायतदारांच्या समस्या कशा सोडवता येतील, अशा विविध मुद्द्यांवर या चर्चासत्रात विचारमंथन होणार आहे. कोकणातील जाणकार नागरिकांनी एकत्र येऊन विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करावी आणि भविष्यासाठी धोरणात्मक दिशा ठरवावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या चर्चासत्रात डॉ. केतन चौधरी, सुजय मोरे, डॉ. सुमेधा नाईक आणि व्ही. के. सावंत हे विषयाची मांडणी करणार आहेत. याशिवाय प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. सतीश लळीत, अभिजित हेगशेट्ये, ॲड. देवदत्त परुळेकर, मल्हार इंदुलकर, डॉ. ज्योती बुआ तोरसकर, संदीप निंबाळकर, डॉ. राजेंद्र मुंबरकर, सुभाष लोमटे, डॉ. मनीषा गुप्ते, सुभाष वारे यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत.
चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी उपेंद्र टण्णू (९८८१७०१८८१) किंवा लक्ष्मीकांत खोबरेकर (९४२२९४६२१२) या व्हॉट्सॲप क्रमांकांवर संपर्क साधून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.
S. M. Joshi Socialist Foundation and Barrister Nath Pai Sevangan will host a seminar in Malvan on October 18 to discuss sustainable tourism, biodiversity, fisheries and farmers’ issues in Konkan.











