Malvan Municipal Council has built a check dam near Deulwada and another near the Dhampur water supply well with public participation to support groundwater recharge and address potential water scarcity.
पाणीटंचाई रोखण्यासाठी पुढाकार; धामापूर नळपाणी योजनेच्या विहिरीजवळही लोकसहभागातून बंधारा
मालवण (प्रतिनिधी) : आगामी काळात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजनांना गती देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषदेच्या वतीने रेवतळे-देऊळवाडा खाडीच्या पुढील भागातील नदीपात्रावर, देऊळवाडा सागरी महामार्ग परिसरात बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्यात गोडे पाणी अडवून ते जमिनीत मुरल्यास परिसरातील भूजलसाठा वाढण्यास मदत होणार आहे. या भागात अन्य ठिकाणीही बंधारे उभारण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढवणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे, या उद्देशाने नगरपरिषदेकडून हा उपक्रम राबवण्यात आला. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जलसंधारणासोबतच पाणी बचत आणि अन्य उपाययोजनांनाही प्राधान्य दिले जात असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.
या बंधारा उभारणी मोहिमेत नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव आणि नगरसेविका नीना मुंबरकर यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी श्रमदान केले.
दरम्यान, मालवण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धामापूर नळपाणी योजनेच्या विहिरीजवळील वहाळावरही मागील आठवड्यात बंधारा उभारण्यात आला. नगरपरिषदेच्या नळपाणी योजना विभागाच्या पुढाकाराने तसेच धामापूर व काळसे ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून हे काम करण्यात आले. शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या धामापूर येथील विहिरीजवळ पाणी अडवण्यासाठी केलेली ही उपाययोजना उपयुक्त ठरणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी दिली.
जलसंधारणाच्या या कामांमुळे पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढवण्यास आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.












