Malvan’s Hanuman Temple Ganeshotsav will feature bhajan, double-bari singing, Dashavatari theatre, religious rituals, mahaprasad and a grand Ganesh immersion procession from October 24 to 30, 2026.
डबलबारी भजनाचा सामना, दशावतारी नाट्यप्रयोग, धार्मिक विधी आणि ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक
मालवण (प्रतिनिधी) : मालवणच्या सोमवारपेठेतील श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २४ ऑक्टोबर ते शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भजन, डबलबारी सामना, दशावतारी नाट्यप्रयोग, लघुरुद्र, अथर्वशीर्ष पठण, महाआरती आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमांची मेजवानी गणेशभक्तांना अनुभवता येणार आहे.
शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून श्री सत्यनारायण महापूजा आणि तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता सुश्राव्य भजन, तर रात्री १० वाजता २० बाय २० आमने-सामने डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे. यामध्ये कुडाळ-भरणी येथील श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा विनोद चव्हाण आणि देवगड तालुक्यातील नादान येथील महाडेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संदीप पुजारे यांच्यात जुगलबंदी रंगेल. ‘गणपती आणि यमधर्म युद्ध’ हे भारुड या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुश्राव्य भजन होईल. रात्री १० वाजता श्री दत्त माऊली संयुक्त दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग यांचा पारंपरिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. यावेळी ‘वाक्रकली अम्मन (चतुरंग)’ हे नाटक सादर होईल.
मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता लघुरुद्राचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० वाजता प्रसिद्ध मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता देवगड येथील वारकरी भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री १० वाजता मराठी चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे.
गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी अथर्वशीर्ष पठण आणि सहस्र दुर्वा अर्पण करण्याचा धार्मिक कार्यक्रम होईल. रात्री ७.३० वाजता श्री महालक्ष्मी बाळ गोपाळ मंडळ, रेवतळे यांच्या सौजन्याने महाआरती करण्यात येणार आहे.
शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता कणकवली येथील सिंधुगर्जना ढोल-ताशा पथकाच्या गजरात आणि पारंपरिक चलचित्र देखाव्यांसह श्री गणरायाची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी व गणेशभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.












