कर्लाचाव्हाळ येथे २२ फूट लांबीचा बंधारा पूर्ण; संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान
मालवण (प्रतिनिधी) : अल निनोचा संभाव्य प्रभाव आणि पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन आनंदव्हाळ गोवेकरवाडी येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी जलसंधारणासाठी पुढाकार घेतला आहे. पहिल्या बंधाऱ्याच्या उभारणीनंतर ग्रामस्थांनी आता कर्लाचाव्हाळ (वेताची व्हाळी) येथे दुसरा बंधारा स्वखर्चातून आणि श्रमदानातून बांधून पूर्ण केला आहे. २२ फूट लांब आणि साडेतीन फूट उंचीच्या या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत व्हावी, हा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे.
आनंदव्हाळ गोवेकरवाडी येथील थोरला व्हाळ येथे काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी पहिला बंधारा उभारला होता. त्यानंतर जलसंधारणाचे हे काम पुढे नेत दुसरा बंधारा बांधण्यात आला. संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून ग्रामस्थांनी एकत्र येत हा उपक्रम हाती घेतला आहे.
शासकीय मदतीची वाट न पाहता श्रमदान
आनंदव्हाळ गावातील गोवेकरवाडी हा परिसर उंचावर आणि कातळ भागात वसलेला आहे. त्यामुळे पाणी साठवण्याच्या मर्यादित संधी लक्षात घेता, पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते भूगर्भात मुरवणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. याच उद्देशाने कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता गावातून वाहणाऱ्या ओहोळावर दोन बंधारे उभारण्यात आले आहेत.
स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसामग्री, स्वखर्च आणि सामूहिक श्रम यांच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा उपक्रम जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट परिसरातील अन्य गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
दुसऱ्या बंधाऱ्याच्या उभारणीत पोलीस पाटील दशरथ गोवेकर, अनंत नांदोस्कर, पपी गोवेकर, निलेश गोवेकर, संदीप गोवेकर, राकेश गोवेकर, शैलेश गोवेकर, भाऊ गोवेकर, वीरेश नांदोस्कर, मंदार गोवेकर, उमेश गोवेकर आणि किरण गोवेकर यांनी सहभाग घेतला.
पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन ग्रामस्थांनी एकत्रितपणे उचललेले हे पाऊल स्थानिक जलसंधारणाच्या प्रयत्नांना बळ देणारे आहे.









